‘महाराष्ट्रात तालिबानी राजवट ? पत्रकारांनो प्रश्न विचाराल तर नोटीस पाठवू’, नगरमधील प्रकारावर भाजप प्रवक्त्यांनी घेतला आक्षेप

'महाराष्ट्रात तालिबानी राजवट? पत्रकारांनो प्रश्न विचाराल तर नोटीस पाठवू', असे ट्विट करत नगरमधील प्रकारावर केशव उपाध्ये (Keshav Upadhye)यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

    मुंबई : लसीकरणाबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला अहमदनगर(Notice To Ahmadnagar Journalist) महापालिकेने नोटीस बजावली आहे. या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवत भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची तुलना तालिबानशी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये(keshav Upadhye) यांनी व्टिट करत महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे. ‘महाराष्ट्रात तालिबानी राजवट? पत्रकारांनो प्रश्न विचाराल तर नोटीस पाठवू’, असे ट्विट करत नगरमधील प्रकारावर केशव उपाध्ये यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

    पत्रकाराला नोटीस बजावल्याने वेगळे वळण
    स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर येथे करोना संबंधीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत प्रश्न विचारले गेले. महापालिकेच्या लसीकरण केद्रांवर गोंधळ दिसत असून काही ठिकाणी कर्मचारी लस बाहेर विकत असल्यासंबंधी तक्रारी आहेत, असे एका पत्रकाराने मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणले. त्यावर असा गैरप्रकार होत असेल तर त्याची चौकशी करण्याची सूचना मुश्रीफ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. दरम्यान, यावरून महापालिका प्रशासनाने थेट संबंधित पत्रकाराला नोटीस बजावल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकाराचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला महाविकास आघाडी सरकारला भाजप प्रवक्ता केशव उपाध्ये यानी देखील व्टिट करत सवाल केला आहे.. ‘महाराष्ट्रात तालिबानी राजवट? पत्रकारांनो प्रश्न विचाराल तर नोटीस पाठवू’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

    नोटीसवर शिवसेनेचीही नाराजी
    महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता असून महापालिकेच्या नोटीसवर शिवसेनेनेही नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला नोटीस पाठविण्यापेक्षा महापालिका प्रशासनाने आपला कारभार सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे. अनेक लसीकरण केंद्रासंबंधी तक्रारी आहेत. नागरिक तक्रारी करतात, आम्ही नगरसेवकही तक्रारी करत आहोत. मात्र, त्यांची चौकशी करण्यापेक्षा पत्रकाराला नोटीस पाठवली गेली. प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज बंद करणाऱ्या या तालिबानी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करीत आहोत. शिवसेनेतर्फे याचा पाठपुरावा केला जाईल, असे बोराटे यांनी सांगितले.