कोल्हापूर जिल्ह्यात आज आणखी २ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णसंख्या २५

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याची ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनकडे वाटचाल सुरू असतानाच अचानक लॉकडाऊन शिथिल झाल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सलग तीन दिवसात ८ रुग्ण वाढल्याने मोठे झटके बसले

 कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याची ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनकडे वाटचाल सुरू असतानाच अचानक लॉकडाऊन शिथिल झाल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सलग तीन दिवसात ८ रुग्ण वाढल्याने मोठे झटके बसले आहेत.त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ३  रुग्ण आढळून आले होते, तर काल बुधवारी मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातून चंदगडला परतलेल्या तिघाजणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली होती. यात एक ३० वर्षीय महिला,एक अकरा वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी अशा तिघा जणांचा  समावेश होता.

छत्रपती प्रमिला राजे जिल्हा सरकारी रुग्णालयात या आधीच एकूण १० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते.त्यातच गेल्या तीन दिवसांत एकूण ८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने आत्तापर्यंतची जिल्ह्याची कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २५ झाली असून यापैकी ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल बुधवारी आढळून आलेल्या तिघांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईहून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास केल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी दिली. तर आज पुन्हा मुंबईहून पतीसह प्रवास करणाऱ्या एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे तिच्या कोरोना चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.तिचा पती आणि मोटारीचा चालक यांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.हे पतिपत्नी शाहूवाडी येथील शित्तुर वारूण येथील असून त्यांना शिवाजी विद्यापीठात संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.तर दुसरा रुग्ण इचलकरंजी येथील असून तो २० वर्षीय तरुण आहे.असे सीपीआर प्रशासनाने सांगितले आहे. इचलकरंजी येथील तरुणावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अद्याप कोल्हापुरात पुण्या-मुंबई सारखी परिस्थिती नसल्याने आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार १० दिवसात रुग्णाला सोडले जात नाही, तर १४ दिवसच उपचार केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.