भोंदूगिरी करून कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या तिघांवर जुना राजवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

कोल्हापूर: कोल्हापुरात आपल्या मुखातून प्रत्यक्ष स्वामी व साईबाबा बोलतात असे भासवणाऱ्या भोंदू बाबा सह त्याच्या तीन साथीदारांना चक्क पोलीस कोठडीची हवा खायला पाठवण्यात आल्याची घटना आज घडली

 कोल्हापूर: कोल्हापुरात आपल्या मुखातून प्रत्यक्ष स्वामी व साईबाबा बोलतात असे भासवणाऱ्या भोंदू बाबा सह त्याच्या तीन साथीदारांना चक्क पोलीस कोठडीची हवा खायला पाठवण्यात आल्याची घटना आज घडली आहे.याबाबतची फिर्याद संदीप नंदगावकर यांनी दिली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू बाबा फडणीस व सहस्रबुद्धे यांचा  कोल्हापुरात मंगळवार पेठ येथे मठ आहे.या मठात फिर्यादी नंदगांवकर, त्याची पत्नी व भाऊ दर्शनासाठी जात होते. त्यांना भोंदूबाबा फडणीस याने नियमित यावयास लावले, नंदगावकर व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला.प्रवीण फडणीस यांच्या मुखातून साक्षात स्वामी आणि साईबाबा बोलतात अशी भलावण करून संदिप प्रकाश नंदगांवकर (वय – ३८, रा. देवकर पाणंद) व त्यांची पत्नी स्वाती नंदगांवकर या भक्तांकडून फ्लॅट, मठ व कसबा तारळे (ता.राधानगरी) येथील  गोशाळेसाठी तब्बल ३५ लाख रुपये घेऊन  फसवणूक केली.या फसवणुकीमध्ये फडणीस याचे  अन्य दोन सहकारी सुद्धा सहभागी आहेत, संदीप नंदगावकर याने आपली फसवणूक झाल्याचे कळताच 
प्रविण विजय फडणीस (वय ४४, रा. मंगळवार पेठ), त्याचा गुरू श्रीधर नारायण सहस्त्रबुध्दे (वय- ५५,रा. फुलेवाडी) व त्यांची साथीदार सविता अनिल अष्टेकर ( रा. मंगळवार पेठ) या तिघांवर जुना राजवाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भोंदूबाबा प्रविण विजय फडणीस (वय ४४, रा. मंगळवार पेठ), त्याचा गुरू श्रीधर नारायण सहस्त्रबुध्दे (वय- ५५,रा. फुलेवाडी) व त्यांची साथीदार सविता अनिल अष्टेकर ( रा. मंगळवार पेठ) या तिघांना राजवाडा पोलीसांनी आज मध्यरात्रीच अटक केली आहे. 
 
संदीप नंदगांवकर यांनी दिलेल्या फिर्यादीत या त्रिकुटाने अन्य भक्तांकडून ३ कोटी ९६ लाख ३४ हजार ४९० रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.  २०१३ पासून  २९ मे २०२० पर्यंत भोंदू बाबा फडणीस याने त्याचा गुरु श्रीधर सहस्त्रबुध्दे आणि त्यांची साथीदार सविता अष्टेकर हिच्या मदतीने, फडणीस यांच्या अंगात स्वामीचा संचार होतो, स्वामीची ताकत त्यांच्यामध्ये येते, असे भासविले. तसेच श्रीधर सहस्त्रबुध्दे यांच्यात साईबाबांचा संचार होवुन त्यांच्या मुखातून साईबाबाच बोलतात,असे पटवून दिले. त्यांनतर नंदगांवकर कुटुंबाचा विश्वासघात करुन त्यांच्याकडुन वेळोवळी ३५ लाख रुपये उकळले.
तसेच फिर्यादीने आपला भाऊ प्रविण प्रकाश नंदगावकर यांचेकडुन ही मोठी रक्कम घेतल्याचे व त्या सोबतच ओंकार किशोर बाजी, मंदार शिरीष दिक्षीत, रेणुका अरविंद चिंगरे, श्रीमती विद्या गिरीष दिक्षीत, केदार शिरीष दिक्षीत, रुपा किशोर बाजी, श्रीमती दिपा नारायण बाजी, शहाजी हिन्दुराव पाटील, गोविंद लक्ष्मण जोशी, मिनाक्षी मिलींद करी, एकता जयंत जोशी, जयंत मानव जोशी या भक्तांचीही अशाच प्रकारे अर्थिक फसवणुक करुन या सर्वांना ३ कोटी ९६ लाख अशा मोठ्या रक्कमेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 
 
जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज अटक करून या तिघा भामट्या भोंदूबाबांना सकाळी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील हे करत आहेत.