कोल्हापुरात परप्रांतीय मजुरांची गर्दी – घरी जाण्यासाठी होतेय धडपड, पर्याय न मिळालेल्यांची पायपीट सुरु

कोल्हापूर: आम्हाला आमच्या गावाकडे पाठवा अशी मागणी करत आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रणरणत्या उन्हात जिल्ह्याच्या तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील शेकडो परप्रांतीय मजूर शिरोली येथील छत्रपती शिवाजी

 कोल्हापूर: आम्हाला आमच्या गावाकडे पाठवा अशी मागणी करत आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रणरणत्या उन्हात जिल्ह्याच्या तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील शेकडो परप्रांतीय मजूर शिरोली येथील छत्रपती शिवाजी मैदानावर जमले,त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. काल बिहारला जाणाऱ्या चारशे मजुरांना याच शिरोलीच्या शिवाजी मैदानावरून एसटी बसमध्ये बसून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू रेल्वे टर्मिनसवर आणण्यात आले होते.त्यामुळे आज उत्तर प्रदेशसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशमधील शेकडो परप्रांतीय मजुरांना कोणीतरी दिली आणि या मजुरांनी  मैदानावर एकच गर्दी केली होती. यामध्ये कागल, गोकुळ शिरगाव व शिरोली अशा तीनही औद्योगिक वसाहतींमधील उत्तर प्रदेशच्या शेकडो मजुरांचा समावेश होता.या मजुरांचे लोंढे सकाळी आठ वाजल्यापासून मैदानाकडे पायी चालत जात होते.

या गर्दीची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी येऊन या मजुरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. व त्यांना आपापल्या राहत्या ठिकाणी परत जाण्याची विनंती केली.पोलिसांच्या या विनंतीला मान देऊन काही परप्रांतीय पुन्हा आपल्या राहत्या घरी परतले मात्र काही परप्रांतीयांनी आपण घरमालकाचे सगळे भाडे देऊन खोली सोडून बाहेर पडल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्याला आता रस्त्यावर किंवा स्टेशनवर राहण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा आम्ही चालत उत्तर प्रदेशला जाऊ असे सांगत काही मजुरांनी चालत पुण्याची दिशा पकडली. तर त्यापैकी काही मजूर पायी चालत कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनकडे जाऊ लागले. त्यांच्यासोबत महिला व मुलेही होती. सर्व बाडबिस्तारा डोक्यावर घेऊन हे मजूर चालत मार्गक्रमण करत होते.