कोल्हापूरहून १ हजार ६६ मजुरांना घेऊन जबलपूरकडे ट्रेन रवाना

कोल्हापूर: जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे आज सायंकाळी ५ वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या २२ बोगीमधून १ हजार ६६ मजूर आपल्या गावी

कोल्हापूर: जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे आज सायंकाळी ५ वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या २२ बोगीमधून १ हजार ६६ मजूर आपल्या गावी मार्गस्थ झाले. मध्यप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांमधील मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून जलबपूरकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या बस तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या महाविद्यालयीन विद्यार्थी वाहतूक बसमधून विविध तालुक्यात असणाऱ्या मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली. या प्रवाशांच्या खाण्या पिण्याची सोयही करण्यात आली.

थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दाखविलेल्या हिरव्या झेंड्यानंतर जिल्ह्यातील ही पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशकडे रवाना झाली. टाळ्यांच्या गजरात या कामगारांची रवानगी करण्यात आली.  यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे आदी यावेळी उपस्थित होते.   

करवीरमधील ३६२, इचलकरंजीमधील ९६, शिरोळमधून ११२, गगनबावडामधील १३,हातकणंगलेमधून ३८८, शाहूवाडीमधील ८, कोल्हापूर शहरातील १३, पन्हाळामधील ५९, कागलमधील १५ असे एकूण १ हजार ६६ कामगार रेल्वेच्या २२ बोगीमधून आपल्या गावी आज रवाना झाले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक अशा राज्यातील कामगार, पर्यटक, प्रवासी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, या सर्वांची यादी संबंधित राज्यांच्या जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. मंजुरी मिळालेल्या आज मध्यप्रदेशमधील १ हजार ६६ जणांना जबलपूरकडे आज पाठविण्यात आले आहे. याच प्रमाणे इतर जिल्ह्यातील कामगारांनाही मंजुरीनंतर त्यांच्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये दोन दिवसात पाठविण्यात येईल. 
महाराष्ट्राबाहेर तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेले जिल्ह्यातील कामगार, पर्यटक, प्रवासी, विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यातील २० तपासणी नाक्यांमधून त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. प्रवेश केल्यानंतर त्यांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये यापूर्वी सीपीआर, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज आणि आयजीएम रुग्णालय इचलकरंजी या तीन रुग्णालयांचा समावेश होता. परंतु त्यांची संख्या वाढवून आता एकूण १३ कोव्हिड केअर रुग्णालय उभारण्यात आली आहेत. या रुग्णालयामध्ये तपासणी झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे त्यांची संस्थात्मक अलगीकरण किंवा गृह अलगीकरणामध्ये त्यांची सोय केली जाईल, असेही जिल्हाधिकारी  देसाई म्हणाले. जयसिंगपूर,शिरोळ, इचलकरंजी परिसरातून मध्यप्रदेशला जाणाऱ्या मजुरांसाठी  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजच्यावतीने बस सेवा दिली. या सर्व मजुरांना त्यांनी आज निरोप दिला. यावेळी शिरोळचे तहसिलदार डॉ. अर्पणा मोरे, गट विकास अधिकारी शंकर कवितके, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर आदी उपस्थित होते.