गेल्या ७ दिवसांमध्ये १० हजार एस.टी.बसमधून १ लाख ३४ हजार ५३८ मजूर राज्यांच्या सीमेपर्यंत रवाना

मुंबई : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार श्रमिकांना त्यांच्या त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या सात दिवसांमध्ये एसटीच्या तब्बल १० हजार बसेस राज्याच्या विविध भागातून धावल्या.

मुंबई : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार श्रमिकांना त्यांच्या त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या सात दिवसांमध्ये एसटीच्या तब्बल १० हजार बसेस राज्याच्या विविध भागातून धावल्या. आज अखेर १ लाख ३४ हजार ५३८ श्रमिकांनी या बससेवेचा लाभ घेतला आहे. आज दिवसभरात १०३४ एसटी बसेस मधून २२ हजार ६१७ श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचविण्यात आले आहे. एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत एसटीच्या चालकांनी लक्षवेधी भूमिका निभावली आहे. राज्याच्या विविध भागांतून श्रमिकांना घेऊन , सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत सुखरूप व सुरक्षितपणे त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी या चालकांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. अर्थात चालकांच्या या कामगिरीला एसटीच्या इतर कर्मचारी व अधिकारी वर्गाची मोलाची साथ लाभली आहे.