आघाडीच्या नेत्यात तीन अध्यक्षपदावर सहमती

  • काँग्रेसकडे अभ्यागत, खादी ग्रामोद्योग रा.काँ.ला तर सेनेला एसटी महामंडळ

यवतमाळ (का. प्र).   फडणवीस सरकार गेल्यानंतर राज्यात नव्याने उदयास आलेल्या महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत जिल्हास्तरीय तीन मंडळावरील अध्यक्षपदावर सहमती झाली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर दीर्घ कालावधीने महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज २३ ऑगस्टला पार पडली. यवतमाळ विश्राम गृह येथे पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खा. बाळू धानोरकर, आ. डॉ. वजाहत मिर्झा, आ. इंद्रनील नाईक, आ. दुष्यंत चतुर्वेदी, माणिकराव ठाकरे, शिवाजी मोघे, ख्वाजा बेग, पराग पिंगळे, बाळासाहेब मांगुळकर, अतुल राऊत, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

अशासकीय सदस्यांबाबतही लवकरच निर्णय
विधानपरिषद निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आघाडीच्या नेत्यांमध्ये या बैठकीत मंथन झाले. दरम्यानचा कालावधी कोरोना लॉकडाऊनमध्ये गेल्याने राज्य सरकार व महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाटाघाटी होऊ शकल्या नाही. विशेषतः जिल्हास्तरीय समित्यांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्या रखडल्या. कोरोना कालावधीत भाजप आमदार अशोक उईके ह्यांनी अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष म्हणून वैद्यकीय महाविद्यालयासंबंधी बैठक घेतल्याने जिल्ह्यातील अशा समित्यांवरील नियुक्तीचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानुसार ही बैठक आयोजित केली. यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तीन मंडळांच्या अध्यक्षपदावर सहमती झाली त्यात प्रामुख्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्षपद काँग्रेसला, खाडी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला तर शिवसेनेला राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद देण्यावर निश्चिती झाली. आता हे अध्यक्षपद नेमके कुणाला द्यायचे ते नाव त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांनी लेटर पॅडवर द्यायचे आहेत. त्यानंतर लवकरच जिल्हास्तरीय समित्यांवरील अशासकीय सदस्यांची निवड केल्या जाणार आहे. करिता तत्पूर्वी आघाडीच्या घटक पक्षांचा फॉर्मुला निश्चित केल्या जाणार आहे. तीन प्रमुख पक्षांनी समान वाटा घ्यायचा की कसे याबाबत अन्य जिल्ह्यांमध्ये काय फॉर्मुला ठरला याची माहीती घेऊन त्यानंतर सर्वसहमतीनेच ह्या निवडींवर देखील शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आघाडीच्या नेत्यांनी दिली.