महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत जातींचा समतोल ,कशी आहे टीम पटोले जाणून घ्या

राज्यात पक्षाची धुरा नाना पटोले(Nana Patole) यांच्याकडे सोपवल्यानंतर आता पटोले यांची 'जम्बो टीम' जाहीर करण्यात आली आहे. राज्यात आगामी निवडणुका(Election) स्वबळावर लढण्याचे काँग्रेसने(Congress) ठरवले आहे.

    मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची(Maharashtra Pradesh Congress) नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात पक्षाची धुरा नाना पटोले(Nana Patole) यांच्याकडे सोपवल्यानंतर आता पटोले यांची ‘जम्बो टीम’ जाहीर करण्यात आली आहे. राज्यात आगामी निवडणुका(Election) स्वबळावर लढण्याचे काँग्रेसने(Congress) ठरवले आहे. त्याला अनुसरून राज्य कार्यकारिणीत अनुभवी चेहऱ्यांसोबतच तरुण तडफदार नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. या कार्यकारिणीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या नव्या कार्यकारिणीमध्ये जातींचा समतोल साधण्यात आला आहे.

    महाराष्ट्र काँग्रेसच्या १९० जणांच्या कमिटीमध्ये मराठा समाजातील ४३ जणांचा समावेश आहे. तसेच मुस्लिम समाजातील २८ जणांचा काँग्रेसच्या कमिटीत समावेश आहे . याशिवाय ब्राह्मण – ११, ओबीसी -११, एससी- १०, धनगर- ७, आगरी – ६, लिंगायत – ६, माळी – ५, मारवाडी – ४, मातंग – ४ अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जातींना स्थान देण्यात आलं आहे. शिवाय प्रादेशिक संतुलनाचाही विचार करण्यात आलाय. दरम्यान, काँग्रेसच्या या १९० जणांच्या कमिटीत १७ महिला आहेत. महिलांचे हे प्रमाण ९ टक्क्यांच्या आसपास आहे.

    राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. पटोले यांच्या टीममध्ये १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस आणि १०४ सचिवांचा समावेश करण्यात आला आहे.

    राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या समितीत उल्हास पवार, डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुझफ्फर हुसेन, हर्षवर्धन सपकाळ हे सदस्य असणार आहेत. प्रदेश कार्यकारिणीसोबत १४ जिल्हाध्यक्षही जाहीर करण्यात आले आहेत. त्यात ठाणे ग्रामीण, भिवंडी शहर, उल्हासनगर शहर, सोलापूर ग्रामीण, सांगली ग्रामीण, जळगाव शहर, पुणे शहर जिल्ह्यासाठी नवे अध्यक्ष मिळाले आहेत.