शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय, दहावीच्या विद्यार्थ्यांचे ‘या’ निकषांद्वारे होणार मूल्यांकन

शिक्षणमंत्र्यांनी इयत्ता दहावी(Tenth Evaluation) मूल्यमापन प्रक्रिया व इयत्ता अकरावी प्रवेशाबाबत(Eleventh Admission) माहिती दिली. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

  मुंबई: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikawad) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये(Press Conference) शिक्षणमंत्र्यांनी इयत्ता दहावी मूल्यमापन प्रक्रिया व इयत्ता अकरावी प्रवेशाबाबत(Eleventh Admission)  माहिती दिली. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

  वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ राज्यातील कोरोना संसर्गामुळे  शिक्षण क्षेत्रातही खूप मोठ्या प्रमाणावर आव्हानं आलेली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन अध्यापन यासाठी आपण वर्षभर विविध उपक्रम राबवले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च-२०२१ पासून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट असलेले विद्यार्थी, पालक व परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही आमची सगळ्यात महत्वाची प्राथमिका आहे, हे आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहोत. म्हणूनच राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित केलेली इय़त्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील निर्णय आम्ही, राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी वर्षासाठी प्रविष्ट असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे, सरकट उत्तीर्ण करण्यास संदर्भातील परवानगी दिली होती.”

  शिक्षणमंत्री पुढे म्हणाल्या, “ कोरोनामुळे उद्भवलेल्या असमान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे धोरण तयार करताना मी सांगू इच्छिते की, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आली. या सर्वांशी सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण आम्ही निश्चित केले आहे. हे मूल्यमापन धोरणानुसार, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मुल्यमापन करण्यात येईल.”

  त्या पुढे म्हणाल्या की, इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यामापन योजोना शासन निर्णय दि.८ ऑगस्ट २०२० नुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.

  • विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन -३० गुण
  • विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीचे गृहपाठ/ तोडीं परीक्षा/ प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन- २० गुण
  • विद्यार्थ्यांचा इयत्ता नववीचा विषय निहाय अंतिम निकाल – ५० गुण
   या प्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (इयत्ता नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश )

  त्या पुढे म्हणाल्या, “ हे मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोविड-१९ पूर्व काळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (इयत्ता नववीचा) निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद आहे. ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.”

  त्यांनी सांगितले की, “ विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल, या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीयस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यंकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे. मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे.”