गुन्हेगारांवर कठोर व सक्तीची कारवाई करण्यासाठी ‘शक्ती’ कायदा ठरणार महत्त्वाचा : गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यातील महिला अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने 'शक्ती' कायदा अमलात आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर व सक्तीची कारवाई करण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

No  मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्ती विधेयकावर एकमत झाल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. शक्ती कायद्यासाठी आय.पी.सी. कलम, पोस्को कलम, तसेच सी.आर.पी.सी. कलमात बदल करून नवीन कायदा तयार करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यानुसार एखाद्या महिलेवर झालेल्या अत्याचाराचे पुरावे मिळाल्यास आरोपीस याआधी जन्मठेपेची शिक्षा होती, मात्र शक्ती विधेयकानुसार आता मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे प्रस्तावित केले आहे, अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच तीस दिवसात गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, अशी या कायद्याची रूपरेषा असल्याचे ते म्हणाले. येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव विधिमंडळात सर्व पक्षीय आमदारांसमोर ठेवण्यात येईल. विधिमंडळात त्याला मंजूरी मिळाल्यास पुढे केंद्र शासनाकडे व राष्ट्रपतींकडे हे विधेयक मंजुरीस जाईल आणि ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर हा कायदा अमलात आणला जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.