महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय,पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास ठाकरे सरकारकडून स्थगिती(Stay on reservation cancellation decision) देण्यात आली आहे.

  मुंबई: चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर ठाकरे सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा न करताच ७ मे रोजीचा जी आर निघाल्याचे सांगत सरकारने ७ मे रोजीच्या जीआरला सध्या स्थगिती दिली असून अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर पुन्हा विधी आणि न्याय विभागाचे मत मागण्याचा निर्णय घेण्यात आला.

  काँग्रेस नेते आक्रमक
  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला. काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पदोन्नीतील आरक्षणावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. डॉ राऊत यांनी याबाबत मुख्यमंत्र्याची काँग्रेस शिष्टमंडळासह भेट घेतली होती. तसेच या मुद्यावर आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे पक्षातील कार्यकर्त्याना आवाहन केले होते, त्यामुळे तुर्तास या निर्णयाला स्थगिती मंत्रिमंडळाच्या बैठकी आधीच काही तास देण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

  कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठीच
  पदोन्नती होत नसल्याने असलेली नाराजी दूर करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त जागा तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. २५ मे २००४च्या सेवाज्येष्ठतेच्या स्थितीनुसार रिक्त जागा भरण्यात येतील असे सरकारने याबाबतच्या शासन निर्णयात म्हटले होते. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल त्यानुसार मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्य सरकारने त्यापूर्वीच्या जीआरमध्ये म्हटले होते.

  विधी आणि न्याय विभागाचे मत
  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत पदोन्नती आरक्षणावरुन वाद झाल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा न करताच ७ मे रोजीचा जी आर निघाल्याने वाद झाला. सरकारने ७ मे रोजीच्या जीआरला सध्या स्थगिती दिली असून अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर पुन्हा विधी आणि न्याय विभागाचे मत मागण्याचा निर्णय घेण्यात आला.