वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करा – मार्डची आरोग्य विद्यापीठाला विनंती

मुंबई: सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १५ जुलैपासून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केले.

 मुंबई: सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १५ जुलैपासून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केले. परंतु राज्यातील कोरोनाच्या बिकट परिस्थितीत परीक्षा घेतल्यास रुग्णसेवा करत असलेले डॉक्टर हे आरोग्यसेवेतून बाहेर पडतील. त्यामुळे राज्यातील आरोग्यसेवा कोलमडून महाराष्ट्रातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताबरोबरच रुग्ण हिताचा विचार करून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात तसेच त्यांना परीक्षेत सवलत देण्यात यावी, अशी विनंती केईएम मार्डद्वारे विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असून, लॉकडाऊन शिथिल केल्याने रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यातील स्थिती फारच दयनीय आहे. तसेच नागरिक आपापल्या गावी जात असल्याने ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच वैद्यकीय कॉलेजांवर ताण पडत आहेत. त्याचवेळी डॉक्टरांची संख्या अपुरी पडत असल्याने प्रथम व द्वितीय वर्षाच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही कोरोना रुग्णांच्या सेवेमध्ये घेण्याबाबत सरकार विचार करत आहे. अनेक खासगी डॉक्टरांना रुग्णसेवेत सामावून घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच रुग्णसेवेत असलेल्या निवासी डॉक्टरांच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेतल्यास रुग्णसेवेतून तब्बल दोन हजारपेक्षा अधिक डॉक्टर बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे डॉक्टर बाहेर पडल्यास रुग्णसेवा व आरोग्यसेवा पूर्णत: कोलमडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान दोन महिने वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी राखून ठेवलेल्या हक्कांच्या सुट्ट्यांवर गदा येणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ऑगस्टपेक्षा जास्त लांबणीवर ढकलल्यास त्यांची सुपर स्पेशालिटीची पात्रता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून परीक्षेचा घालण्यात आलेल्या घोळामुळे रुग्णसेवेवर होणारा परिणाम लक्षात घेत रुग्णहिताबरोबरच विद्यार्थी हित लक्षात घ्यावे अशी विनंती करत परीक्षा रद्द करण्याची विनंती निवासी डॉक्टरांनी विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांना केईएम मार्डकडून पत्राद्वारे केली आहे. 

विद्यार्थ्यांचे प्रबंधही रद्द करावे

शैक्षणिक अभ्यासक्रम काही प्रमाणात रखडल्याने प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रबंधासाठी लागणारी माहिती जमा करणे अशक्य झाले आहे. तसेच कोरोना रुग्णसेवेचा संपूर्ण भार निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांनी उचलला असल्याने त्यांना प्रबंधासाठी वेळ काढणे अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांचे प्रबंध रद्द करण्यात यावे अशी मागणीही मार्डकडून करण्यात आली आहे. .