मोदींमुळे मुंबई पोलिसांचं टेन्शन वाढणार ; सचिन वाझे प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत दाखल

सीआययू युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआयएचे पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असलेले विक्रम खलाटे सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलीस दलात अनेक वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत

  मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सुरू आहे. सध्या एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे चौकशीत सहकार्य करत नसल्याचं समजतं. याशिवाय वाझेंच्या वरिष्ठांच्या भूमिकेबद्दलही एनआयएला संशय आहे. त्याचसाठी एनआयएचे महासंचालक योगेश चंदर मोदी मुंबईत आले आहेत. योगेश मोदींनी या प्रकरणात व्यक्तीश: लक्ष घातलं आहे. एनआयएचे डीजीच चौकशी करण्यासाठी आल्यानं मुंबई पोलीस दलातले अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

  कोण आहेत योगेश चंदर मोदी?
  योगेश चंदर मोदी हे १९८४ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहे. तसंच मोदींचा कार्यकाळ हा मे २०२१ रोजी संपत आहे. २०१७ मध्ये वाय. सी. मोदींची एनआयच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्र्यात दंगल झाली होती. त्यावेळी वाय. सी. मोदी पोलीस दलात होते. त्यांनी नरेंद्र मोदींना दंगल प्रकरणात क्लीन चीट दिली होती. गोध्रा दंगलीतल्या तीन महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास त्यांनी केला होता. त्यात नरोडा गाव, गुलबर्ग सोसायटी आणि नरोडा पाटिया प्रकरणांचा समावेश होता.

  बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
  सीआययू युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआयएचे पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असलेले विक्रम खलाटे सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलीस दलात अनेक वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. त्यांची चौकशी योगेश मोदींकडून केली जाईल. यातून महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. त्यातून प्रकरणाची दिशा निश्चित होऊ शकेल.