मान्सून महाराष्ट्रात दाखल, विविध भागात बरसल्या सरी

मुंबईः नैऋत्य मोसमी पाऊस अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनने हर्नाई, सोलापूर, जगदाळपूर असा प्रवास सुरू केला असून पुढील ४८ तासांत मान्सून आणखी पुढे सरकणार असल्याची माहिती हवामान खात्यानं

 मुंबईः नैऋत्य मोसमी पाऊस अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनने हर्नाई, सोलापूर, जगदाळपूर असा प्रवास सुरू केला असून पुढील ४८ तासांत मान्सून आणखी पुढे सरकणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. १ जूनला केरळात दाखल झालेला मान्सून निसर्ग चक्रीवादळामुळं आणखी आठ दिवस लांबला होता. मान्सून येत्या २४ तासांत महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला होता. बुधवारी मराठवाडा, हिंगोली नाशिक या भागात पाऊस झाला. मात्र, या मान्सूनपूर्व सरी असल्याचं हवामान विभागनं स्पष्ट केलं होतं. ठाणे, मुलुंड भागातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

मान्सून तळकोकणात सक्रिय झाला आहे. तर, शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत येत्या १३ आणि १४ जूनला मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच तब्बल १८ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.यंदाही जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्येच जिल्ह्यात सरासरी ९४ मिलिमीटर म्हणजेच जवळपास १८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.