येत्या २४ तासांमध्ये केरळमध्ये धडकणार मान्सून, महाराष्ट्रात बरसतोय अवकाळी पाऊस

पुढील 24 तासांत केरळात मान्सून (Monsoon will arrive in Kerala in next 24 hours ) दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. 

    अरबी समुद्राचा (Arabian Sea) पूर्वमध्य भाग आणि कर्नाटक किनारपट्टीच्या दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेत वाहत आहेत. पण सध्या मान्सूनच्या आगमनासाठी (Monsoon) पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत केरळात मान्सून (Monsoon will arrive in Kerala in next 24 hours ) दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे.

    मान्सूनच्या आगमनासाठी अनुकुल बदल होऊन केरळात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राला मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा (Pre monsoon rain) तडाखा बसत आहे. आजही राज्यात पूर्व मोसमी पावसाचं सावट घोंघावत आहे. आज दुपारपासूनचं पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद लातूर आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

    मुंबई आणि ठाणे परिसरातही अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. याठिकाणी आज पाऊस कोसळणार की नाही? याची स्पष्टता काही तासांतचं येईल. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काल मुंबईसह ठाणे परिसरात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे नागरिकांची पुरती धांदल उडाली होती.

    मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी जारी केला आहे. यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरी १०१ टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.