मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्रीपदासाठी महाराष्ट्रातील २ नावं चर्चेत, नारायण राणेंसोबत प्रीतम मुंडेंना मिळू शकते संधी

महाराष्ट्रातून(Maharashtra) दोन नावं मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. भाजप खासदार नारायण राणे(Narayan Rane) यांचं आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांचं नाव चर्चेत असल्याचे समजते.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत शुक्रवारी बैठक घेतली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दोन दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातून(Maharashtra) दोन नावं मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. भाजप खासदार नारायण राणे(Narayan Rane) यांचं आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांचं नाव चर्चेत असल्याचे समजते.

    नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांचं नाव चर्चेत येत ना येतं तोच प्रीतम मुंडे यांचंही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आलं आहे. जर येत्या कॅबिनेट विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपद जाईल.

    डॉ. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवून खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रासोबत प्रीतम मुंडे सामाजिक कामातही अग्रेसर असतात. गोपीनाथ मुंडे यांचं अपघातात निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे त्यांच्या जागेवर निवडून आल्या होत्या.

    मोदी कॅबिनेटमध्ये काही मंत्रिपदांची अदलाबदली, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यातच महाराष्ट्रातील एका भाजप नेत्यांचं केंद्रीय मंत्रिपद धोक्यात असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे त्यांना हटवून नारायण राणेंसारखा आक्रमक चेहरा दिला जाऊ शकतो. ठाकरे सरकारला थेट चॅलेंज देऊन, कोकणात भाजप वाढविण्यासाठी नारायण राणे यांची मदत होऊ शकते, असा अंदाज आहे.