ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा राडा; विद्या चव्हाणांसह महिला आघाडीचे निदर्शक पोलिसांच्या ताब्यात

-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दौऱ्याला विरोध; मनसेची बँनरबाजी!

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे मुंबईत ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हाथरस बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसीटीत मुंबईचे वैभव नेण्याच्या मनसुब्याला मनसेने होर्डिंग आणि फलकबाजीच्या माध्यामातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल रात्रीपासून मुंबई दौऱ्यावर आले. त्यांनी बाँलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा केली. मुंबईत योगी आदित्यनाथ यांचे वास्तव्य ट्रायडंट हाँटेलमध्ये  होते या हाँटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा “ठग” म्हणत बँनरबाजी केली आहे. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे सपने आहेत त्यावर खिल्ली उडवली आहे. ‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली’ असे मनसेच्या पोस्टरवर टीका करण्यात आली. भारतरत्न दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचे मुंगेरीलालचे सपने. मुंबईचे उद्योग पळवणारा “ठग” अशी मुख्यमंत्री योगींवर टीका करण्यात आली आहे.

दरम्यान योगी यांच्या हॉटेल समोर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. हाथरस प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ट्रायडंट हॉटेलच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी आंदोलक महिलांना ताब्यात घेताना गोंधळ  उडाला.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला विरोध केला होता, तर मनसेही आता बँनरबाजी करत योगीना विरोध दर्शवला. दरम्यान, तामिळनाडूतही फिल्मसिटी आहे. तिकडेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाणार आहेत का? की त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय?,असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.