राष्ट्रवादी पक्ष नेहमीच पुरोगामी आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने, आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वांना न्याय देण्याची भूमिका – नवाब मलिक

शरद पवार यांनी नेहमीच पुरोगामी आणि सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून योग्य ते निर्णय होतील आणि कोणत्याही घटकांवर अन्याय केला जाणार नसल्याचे आज राष्ट्रवादी पक्षाच्या झालेल्या मॅरेथॉन बैठकीतून समोर आले आहे.

  मुंबई: मराठा मागासवर्गीय आणि इतर मागास वर्गीयांच्या आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावर सध्या निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी पक्ष गंभीर असून शरद पवार यांनी नेहमीच पुरोगामी आणि सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून योग्य ते निर्णय होतील आणि कोणत्याही घटकांवर अन्याय केला जाणार नसल्याचे आज राष्ट्रवादी पक्षाच्या झालेल्या मॅरेथॉन बैठकीतून समोर आले आहे. इतर मागास समाजाला मंडल आयोगानुसार आरक्षण देण्याचे काम शरद पवारांच्या काळात झाल्याने आताही त्यांची त्याबाबत गंभीर्याने हे आरक्षण टिकवण्याची भूमिका असल्याचे पक्ष प्रवक्ता नवाब मलिक(Nawab Malik) यांनी सांगितले.

  पक्ष आणि सरकारच्या कामगिरीबाबत मार्गदर्शन
  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपार पासून पक्षाचे आमदार, पदाधिकारी आणि मंत्री यांच्या सोबत गेल्या सहा महिन्यांपासूनच्या सरकार आणि पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला यावेळी पवार यांनी आगामी काळातील पक्ष आणि सरकारच्या कामगिरीबाबत मार्गदर्शन केल्याची माहिती प्रवक्ते नबाब मलिक यानी पत्रकारांना दिली.

  महाअधिवक्ता यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय
  मलिक म्हणाले की, इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण टिकावे अशीच पक्षाची भुमिका असून त्याबाबत उपमुख्यमंत्री अजीत पवार मुख्यमंत्र्यासह महाअधिवक्ता यांच्यासोबत चर्चा करून योग्य ती पावले उचलतील असे ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबतही आज चर्चा झाली त्यात गरीब मराठा समाजाला आरक्षणाच्या सवलती मिळाव्या यासाठी सरकारने त्यांच्यासाठी योजना, कर्ज सुविधा आणि शिक्षणाच्या सुविधा देण्याची गरज असल्याचे मलिक म्हणाले.

  याबाबत पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजात भुमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. पदोन्नती आरक्षणाबाबतही आज सकारात्मक चर्चा झाली. पक्षाचे  ध्यक्ष शरद पवार यानी कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका घेण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

   स्वत: शरद पवार पुनावालांशी बोलणार
  आजच्या बैठकीत कोरोना आणि टाळेबंदी तसेच अर्थव्यवस्था आणि म्यूकर मायकोसिस याविषयावर देखील चर्चा झाली, यावेळी लसीकरणाच्या मुद्यावर असलेल्या अडचणी बाबत स्वत: पवार यानी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना भेटून मार्ग काढण्याबाबत भाष्य केल्याचे मलिक म्हणाले. राज्यात टाळेबंदी सारख्या प्रश्नातून निर्माण झालेल्या आर्थिक प्रश्नाकडे गांभिर्याने पाहून उपाय योजना करण्यासाठी तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे ते म्हणाले. १० जुण रोजी टाळेबंदी निर्बंध पाळून प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचा ववर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यानंतर शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटील फेसबुक लाईव्हवरून राज्यातील कार्यकर्त्याना मार्गदर्शन करणार असल्याचे मलिक म्हणाले.

  सरकार पाडण्याबाबत वक्तव्य जुनीच
  कालच्या फडणवीस यांच्या भेटीला केवळ सदिच्छा भेटीचा संदर्भ होता मात्र त्याबाबत आज त्यानी जे काही सरकार पाडण्याबाबत वक्तव्य केले आहे, ते गेल्या दिड वर्षापासून सांगत आहेत. मात्र हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असेही मलिक म्हणाले.