ऑइल मिश्रित डांबर वापरून बनवला जातोय रस्ता

महागाव ते फुलसावंगी रस्त्याच्या कामामध्ये अल्प व ऑइल मिश्रित डांबर वापरण्यात येत असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहे; परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष
  • तीस कोटींच्या रस्त्याची कंत्राटदाराने लावली वाट

गणेश भोयर.
यवतमाळ (Yavatmal). महागाव ते फुलसावंगी रस्त्याच्या कामामध्ये अल्प व ऑइल मिश्रित डांबर वापरण्यात येत असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहे; परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

महागाव ते फुलसावंगी या रस्त्याचे केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत काम प्रगतीपथावर असुन सदर कामाचे कंत्राट पुसद येथिल गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर खड्डयांचे साम्राज्य होते. त्यामुळे वाहन धारकांना खुप त्रास सहन करावा लागला. परंतु आता नवीन रस्ता तयार होत असल्याने वाहन धारकांची चेहऱ्यावर एक समाधान होते; मात्र वाहनधारकांचा आनंद काही काळापूरताच ठरला. कारण ज्या कंत्राटदाराला हे काम दिले त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ठ दर्जाची साहित्य ज्यामध्ये ऑइल मिश्रित व डांबराचे अल्प प्रमाण असलेले डांबर सर्रासपणे वापरून रस्ता बनविल्या जात आहे. यामध्ये शासनाने ठरवुन दिलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेलाच तिलांजली दिली आहे. कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या मधुर संबंधातुन अतिशय निकृष्ठ दर्जाचा रस्ता तयार करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी घशात उतरविण्याचा घाट कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी घातला असुन या रस्त्याच्या निकृष्ठ होत असलेल्या कामाबद्दल सुज्ञ नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या;

परंतु अगोदरच कंत्राटदारांशी मिळालेल्या अधिकाऱ्यांनी नागरिकांनाच धाक दपट केल्याची माहिती आहे. अल्प डांबर व ऑइल मिश्रित डांबर वापरून बनविलेला रस्ता किती दिवस टिकणार ? हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ठ होईल अधिकारी व कंत्राटदार यांच्या मधुर संबंधातुन बनलेल्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांनी पाहणी केल्यास नक्कीच या रस्त्याच्या कामाचे गौडबंगाल बाहेर येईल.