१५ जूनपासून सुरु होणार ऑनलाईन वर्ग- १ जुलैपासून शाळा-महाविद्यालये सुरु करण्याची तयारी

मुंबई: कोरोनाचा सर्वाधिक फटका हा शिक्षण क्षेत्राला बसला आहे. विद्यार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे. शाळा महाविद्यालये पुन्हा कशी सुरु

मुंबई:  कोरोनाचा सर्वाधिक फटका हा शिक्षण क्षेत्राला बसला आहे. विद्यार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे. शाळा महाविद्यालये पुन्हा कशी सुरु करता येतील याकरिता सर्व पर्यायांचा विचार करण्यात येतो आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता १५ जूनपासून ऑनलाईन वर्ग सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील ज्या विभागांमध्ये गेल्या एका महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत, त्या भागात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. यासह इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत न बोलवता, ऑनलाईन शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.    

दुसरीकडे खासगी क्षेत्रातील अनेक शैक्षणिक संस्थांनी १ जूनपासून ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत. रेयान इंटरनॅशनल, सिंघानिया आणि रिलायन्स इंटरनॅशनलसारख्या मोठ्या खासगी शैक्षणिक संस्थांनी एप्रिल महिन्यापासूनच ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत. काही खासगी क्लासेसनी तर दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर लगेचच ऑनलीन क्लासेस चालवून बर्यापैकी अभ्यासक्रम संपविलाही आहे. सुस्थितीत असलेले पालक जास्त पैसे खर्च करुन आपल्या मुलांना खासगी क्लासेसमध्ये घालतात, त्यांच्याकडे लॉपटॉप आणि इंटरनेटची सुविधा असल्यानेही ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांना त्याचा फायदा होतो आहे.     
 
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे स्वीय सचिव सुनील चंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग १ जुलैपासून सुरु करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग एक ऑगस्टपासून सुरु होतील. तर पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग हे एक सप्टेंबंरपासून सुरु करण्याचे नियोजन आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला असून, आता त्यावर कधी शिक्कामोर्तब होते, याकडे लक्ष आहे.  तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज एक तासाचा ऑनलाईन वर्गाला मंजुरी देण्याच्या विचारात शिक्षण विभाग आहे. सहावी ते आठवी साठी दोन तास तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन तासाचे ऑनलीन वर्ग सुरु करण्यात येतील. एकरावीचे वर्ग दहावीच्या निकालावर अवलंबून असणार आहेत. 
ऑनलाईन क्लासेसना विरोध असतानाही मुख्याध्यापक आणि शिक्षक हे सरकारी आदेशाचे पालन करण्याच्या तयारीत आहेत. शाळांची साफसफाई सुरु करण्यात आली आहे. सर्व शिक्षकांना १५ जूनपासून शाळेत येण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक दिनेश तिवारी यांनीं दिली आहे. मुंबई महापालिकेने शिक्षकांना ऑनलाईन वर्ग कसे घ्यावेत याचे प्रशिक्षणही दिले आहे.  
शिक्षकांनी १५ जूनला शाळेत उपस्थित राहावे हा आदेश सरकारने दिला असला तरी पुढे काय याबाबत अनिश्चितता आहे, शाळेत जाऊन की घरुन ऑनलाईन वर्ग चालवायचे आहेत, याची स्पष्टता अद्याप शिक्षकांना नाही. त्यामुळे शिक्षक द्विधा मनस्थितीत आहेत. प्रवास कसा करायचा ही मुख्य समस्या शिक्षकांसमोर आहेच. सरकारच्या या निर्णयावर अनेक शिक्षक संघटनांनी नाराजीही व्यक्त केली आहे. घरातूनच ऑनलाईन वर्ग चालवावेत, यासाठी शिक्षक संघटनाही आग्रही दिसत आहेत.