पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने केली मुक्या जनावऱ्यांच्या चारा-पाण्याची सोय

सोलापूर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी मंदिर समितीच्यावतीने या काळात गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. तालुक्यातील

सोलापूर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी मंदिर समितीच्यावतीने या काळात गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. तालुक्यातील बार्डी वनक्षेत्रात गाई, हरीण, काळवीट असून त्यांच्यासाठी मंदिराने चारा व पाण्याची  मोफत सोय केली आहे.

  कोरोना व्हायरसचा पादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्याने १७ मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून पंढरपूर शहर व परिसरात अडकून राहिलेल्या मजूर व निराधार नागरिकांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीच्यावतीने दररोज ३ हजार फूड पॅकेट देण्यात येत आहेत. यातच मध्यतरीच्या काळात अशी बाब निदर्शनास आली की, शहरात अंदाजे ६० जनावरे अशी आहेत की, ती दान दिलेल्या चाऱ्यावर त्यांची उपजीविका होती. परंतु लॉकडाउनमुळे त्यांना कोणीच चारा उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे या मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मंदिर समितीने साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांचा चारा गेल्या १० दिवसापासून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
 बार्डी तालुका पंढरपूर येथील वन क्षेत्रामध्ये ३०० पेक्षा जास्त गाई व २०० पेक्षा जास्त हरीण, काळवीट व इतर वन्यजीव आहेत. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या वन्यजीवांना विविध स्वयंसेवी संस्थेकडून चारा पुरवठ्याचे काम केले जात होते. परंतु कोरोनाचा पादुर्भाव वाढल्याने अनेक गोष्टीवर निर्बंध आल्याने या स्वयंसेवी संस्थांनी इकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या वन्यजीवाचा खास करून गाईचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. ही बाब मंदिर समितीचे मा सदस्य श्री संभाजी शिंदे यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी मंदिर समितीकडे या जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था करावी अशी आग्रहाची मागणी केली होती. त्यानंतर सदस्य  ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व कार्यकारी अधिकारी  विठ्ठल जोशी व व्यवस्थापक  बालाजी पुदलवाड यांनी सदर ठिकाणी सक्षम भेट दिली व वस्तुस्थितीची पाहणी केली.त्यामध्ये अंदाजे ३०० हुन अधिक गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती.  सह अध्यक्ष  गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर सर्व सदस्य महोदयांशी चर्चा करून या वन्य प्राण्यांना मंदिर समितीने वाचविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिला टप्पा म्हणून ४ मे २०२० रोजी २ हजार ५०० पेंडी देशी कडबा या वन क्षेत्राजवळील  सुखदेव महाराज मठात ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे दररोज १५० ते २०० पेंडी चारा या वन्य जीवांना देण्यास आजपासून सुरुवात केली आहे. तसेच दर दोन दिवसांनी २५ हजार लीटर पाणी  टँकरद्वारे पाठवून तेथील पाण्याची टाक्या व पाणवठे भरून घेण्यात येत आहेत. जेणेकरून या तहानलेल्या जीवांना पाणी वेळेत उपलब्ध होईल.सद्यस्थितीत ३०० च्या आसपास जनावरे या ठिकाणी असल्याचा अंदाज आहे. परंतु ही संख्या वाढली तर त्यांच्यासाठी अधिकचा चारा व पाणी मंदिर समितीने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.