पुणे जिल्ह्यातील अनेक तालुके जोरदार पावसामुुळे असे जलमय झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील अनेक तालुके जोरदार पावसामुुळे असे जलमय झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. तर शिक्रापूरमध्ये ओढ्याला आलेल्या पुरात वाहून जाणाऱ्यांना पोलिसांनी तत्परता दाखवत वाचवल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथे रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे(Heavy rains) सर्व ओढ्या नाल्यांना पूर (flood) आला यावेळी शिक्रापूर येथील ओरा सिटी लगतच्या ओढ्याला देखील मोठा पूर आला. येथील पुरातून एम एच १४ बी. आर. ४६४४ ही स्विफ्ट कार वाहून जाऊन पुराच्या मध्यभागी झाडाला अडकली आणि कार मधील दोघे मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले. यावेळी शेजारील नागरिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार अनिल जगताप व संतोष शिंदे यांना माहिती दिली असता तातडीने पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस हवालदार संजय ढमाळ, पोलीस शिपाई लक्ष्मण शिरसकर, होमगार्ड मनोहर पुंडे, योगेश बधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस हवालदार संजय ढमाळ, होमगार्ड मनोहर पुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता ओढ्याच्या पुराच्या पाण्यात उडी घेतली. त्यांनतर दोरीच्या साहाय्याने पाण्यात अडकलेल्या युवकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले, यावेळी पाण्याचा वेग इतका होता की पोलिसांच्या जिवालादेखील धोका पोहचू शकला असता. मात्र पोलिसांनी कसलीही पर्वा न करता पाण्यातील दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आणि तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर दोघांनाही बाहेर काढण्यात यश आले. अनुकुमार जाधव आणि निसार शेख या दोघांना अखेर जीवदान मिळाले. त्यांनी अक्षरशः पोलिसांना हात जोडत त्यांचे आभार मानले. परिसरातून पोलिसांच्या कार्याचे जोरदार कौतुक होत आहे.

दरम्यान, बारामतीसह इंदापूर व दौंड तालुक्यात पावसाने हाहाकार उडवला आहे. गेली 60 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याने नदी नाल्यांना महापूर आला आहे. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली असून अनेक भागातील बागायती जमिनी वाहून गेल्या आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरले. कऱ्हा, नीरा व भीमा नदीला पूर आला आहे. बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदरसह इतर तालुक्यांतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बुधवारी दिवसभर या भागात पावसाची संततधार सुरु होती. रात्री सातनंतर मुसळधार पाऊस सुरु झाला. अनेक भागात रात्रभर पाऊस कोसळत होता.

बारामती-इंदापूर, बारामती-नीरा, बारामती-कुरकुंभ या राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रात्री ठप्प होती. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.