मुंबईत पावसाची संततधार, ‘या’ तारखेपासून राज्यातही पाऊस जोर पकडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने(Rain In Maharashtra) चिंतेचे ढग दाटून आले आहेत. मात्र हवामान विभागाने 10 जुलैपासून पाऊस जोर पकडेल, असा अंदाज वर्तवला आहे.

  सुरुवातीच्या काही दिवसांत झालेल्या पावसानंतर(Rain) उरलेला संपूर्ण जून महिना कोरडाच गेला होता. मुंबईप्रमाणे(Rain In Mumbai) महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात पावसाने दडी मारली होती. गुरुवारी म्हणजेच 8 जुलै रोजी हे चित्रं थोडंसं बदललेलं आहे. हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यात पावसासाठी(Rainy Climate In Maharashtra) पोषक वातावरण निर्माण होत आहे.

  7 जुलै रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी अर्धा तास चांगला पाऊस झाला होता. गुरुवारी मात्र सकाळपासून पावसाची संततधार सुरू झाल्याचं मुंबईकरांना पाहायला मिळालं.

  राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने चिंतेचे ढग दाटून आले आहेत. मात्र हवामान विभागाने 10 जुलैपासून पाऊस जोर पकडेल, असा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरो आणि भरपूर पाऊस पडो अशी प्रार्थना सर्वसामान्य नागरीक आणि खासकरून शेतकरी करत आहे.

  अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असून यामुळे गुरुवारपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल अशी शक्यता आहे.

  पुढच्या दोन दिवसांत म्हणजेच 10 जुलैपासून पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, नागूपर, वर्धा आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकेल अशी आशा वर्तवली जात आहे.

  हवामान खात्याने 10 जुलै रोजी मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात 10 तारखेला तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्य़ांत तुरळक भागात मुसळधार ते अतिवृष्टी होईल अशी शक्यता वर्तवली आहे.  तसेच 11 जुलै रोजी मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यांत मुसळधार, तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.