राजर्षी शाहूंचे विचार जगाला प्रेरणादायी – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे संपूर्ण देशाला समतेचा संदेश देणारे लोकराजे होते. राजर्षी शाहूंचे विचार आणि कार्य केवळ देशालाच नव्हे तर जगालाही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन

कोल्हापूर –  राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे संपूर्ण देशाला समतेचा संदेश देणारे लोकराजे होते. राजर्षी शाहूंचे विचार आणि कार्य केवळ देशालाच नव्हे तर जगालाही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४६ व्या जयंती निमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी  कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन शाहुंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव,  जिल्हाधिकारी  दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,  महापालिका आयुक्त डॉ. मल्लि नाथ कलशेट्टी, वसंतराव मुळीक यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शाहू जयंती सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एकतेचा आणि समतेचा संदेश साऱ्या जगाला दिला. त्या काळात राजर्षी शाहुंनी आयसोलेशन हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली. अशा या कर्तृत्ववान लोकराजाचे स्मरण प्रत्येकानेच करणे काळाची गरज आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामासही गती दिली असून हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वासही  पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला. याकामी शासनाकडून आवश्यक मदत आणि सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राजर्षी शाहुंचा समतेचा संदेश नव्या पिढीस मार्गदर्शक राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेला समतेचा संदेश महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. हाच संदेश नव्या पिढीस प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले. 

कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदा राजर्षी छत्रपती शाहू जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राजर्षी शाहूंचा जन्मदिन आज संपूर्ण राज्यभर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा होत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोकांच्या मनातील राजे होते. त्यांनी त्या काळी केलेले सामाजिक न्यायाचे काम आजही प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचेही ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने त्यांनी राजर्षी शाहूंना अभिवादन केले. दसरा चौकातही  जय-जयकार  राजर्षी शाहू जयंतीनिमित्त दसरा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी परिसरात राजर्षी शाहूंचा जयजयकार करण्यात  आला.

कार्यक्रमास शाहू महाराज छत्रपती, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, वसंतराव मुळीक, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके,  समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, समाज कल्याण उपायुक्त प्रशांत चव्हाण, तहसिलदार शीतल मुळे-भामरे, माजी महापौर हसीना फरास यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि शाहुप्रेमी नागरिक उपस्थित होते.