बुलेट ट्रेनपेक्षा शासनाने कोरोनाकडे लक्ष दिले पाहिजे – आमदार विनोद निकोले

वाडा : पालघर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात सिस्को वेबेक्स या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुनर्वसन व पुनर्स्थापना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी विरोध दर्शविला असून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे बुलेट ट्रेनपेक्षा कोरोना महामारीच्या काळात कोरोनाकडे शासनाने पूर्ण लक्ष दिले पाहिजे ,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या प्रकल्पात मुंबई अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये आदिवासी भागातील डहाणूमधील १६, तलासरी मधील ७, पालघरमधील २७ तर वसईमधील २१ अशी एकूण ७१ गावे असून त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे. 

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व पंचायत समिती पदाधिकारी, सर्व सरपंच, खा. राजेंद्र गावित, आ. विनोद निकोले, आ. श्रीनिवास वनगा, आ. राजेश पाटील, बुलेट ट्रेन कार्यकारी मनीषा गिंभल आदी उपस्थित होते.