
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात ५ ठिकाणी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगत झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ३ पदवीधर मतदारसंघ आणि २ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. याचा निकाल आज (गुरुवार) घोषित केला जाणार आहे. या निवडणुकीत ६९.०८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. अमरावती शिक्षक मतदारसंघात ८२.९१ टक्के एवढं विक्रमी मतदान नोंदवलं गेलं होतं.
हाय प्रोफाईल निवडणूक
महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही आपलेच उमेदवार विजयी होतील, असा दावा केलाय. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांसाठीही ही निवडणूक म्हणजे लिटमस टेस्ट आहे. त्यामुळे दोन्हीकडून आपापली पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. महाआघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण हे मैदानात उतरले होते. तर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.
नागपूर आणि पुण्याकडे खास लक्ष
विरोधी पक्षनेतेत देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर तर चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यात नेमका काय निकाल लागतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे. या मतदारसंघात भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी महाविकास आघाडीनं पूर्ण ताकद पणाला लावल्याचं दिसलं. चंद्रकांत पाटील यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी शरद पवारांनी खास रणनिती आखल्याचंही सांगितलं जातं. ही रणनिती यशस्वी झाली की नाही, हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
प्रमुख उमेदवार
नागपूर पदवीधर मतदारसंघ
- काँग्रेस-अभिजीत वंजारी
- भाजप- संदीप जोशी
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ
- राष्ट्रवादी काँग्रेस– सतीश चव्हाण
- भाजप– शिरीष बोरालकर
पुणे पदवीधर मतदारसंघ
- राष्ट्रवादी काँग्रेस– अरुण लाड
- भाजप– संग्राम देशमुख
पुणे शिक्षक मतदारसंघ
- कॉंग्रेस– जयंत आसगावकर
- भाजप– जीतेन्द्र पवार
अमरावती शिक्षक मतदारसंघ
- शिवसेना– श्रीकांत देशपांडे
- भाजपा– नितिन धांडे