कोल्हापूर –  आंतरराज्य मालवाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी चालक-वाहकांना सुविधा देण्याचे आश्वासन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले.

मालवाहतुकीच्या संदर्भात ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिली.  यावेळी बोलताना परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात विविध प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने नियोजनबद्धरित्या काम केलेले आहे. अत्यावश्यक सुविधा सुरळीत राहाव्यात यासाठी राज्य शासनाने मागणीनुसार २ लाख ५८ हजार ८२९ वाहतुकीचे पासेस २७ एप्रिलपर्यंत दिले आहेत. संकटसमयी सुद्धा लोकांसाठी  सेवा देणारे सर्व वाहन मालक, चालक व वाहकांचे शासनाच्यावतीने मनापासून आभार मानत असल्याचे ते म्हणाले. 
ही अत्यावश्यक सुविधा तसेच आंतरराज्य मालवाहतूक यापुढेही चांगल्या पद्धतीने सुरु राहावी यासाठी, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष कुलतनसिंग अटवाल व कोअर कमिटीचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष बल मलकीत सिंग यांनी खालील मुद्दे उपस्थित केले. 
 
१. चालक व वाहक यांना विमा संरक्षण द्यावे. 
२. राज्यभरामध्ये टोल माफ करावे. 
३.  चेकपोस्ट, टोल प्लाझा, पेट्रोल पंप आणि लोडिंग / अनलोडिंग पॉईंट्सवर वाहन स्वच्छता करण्यात यावी. 
४.राज्य शासनातर्फे सर्व चेकपोस्ट, टोल प्लाझा, पेट्रोल पंप आणि लोडिंग / अनलोडिंग पॉईंट्सवर सॅनिटायझेशनची सुविधा उपलब्ध करावी. 
५.  राज्यातील वाहक व चालक यांच्या वाहतुकीसाठी पासेसची सुविधा उपलब्ध करावी. 
६. ई-पासची उपलब्धता सहज होण्यासाठी यंत्रणा सक्षमपणे उभी करावी. 
७.वस्तू कर / प्रवासी कर / मोटार वाहन कर याना स्थगिती मिळावी. 
८. लॉकडाउन दरम्यान आकारल्या जाणाऱ्या पार्किंग शुल्कामध्ये सवलत मिळावी. 
९. वाहतुकीचा माल उतरविण्यासाठी गोदामे उघडण्याची परवानगी मिळावी. 
१०. वाहतूक क्षेत्रासाठी मदत निधी उपलब्ध करण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करावी. 
११. राज्यातील सीमा चौक्यांवर चालक व वाहकांच्या आरोग्य तपासणी सोबत शिवभोजन सारख्या जेवणाची सुविधा करावी. 
 आंतरराज्य मालवाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी वरील सर्व मागण्यांवर राज्य सरकार ठोस उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले.