राज्य सरकारचा मोठा निर्णय – निवडक उद्योगांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुन्हा वापरण्यास गृहविभागाची तात्पुरती मान्यता

गृह मंत्रालयाने तूर्तास काही उद्योगांना त्यांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन (Oxygen Use) पुन्हा वापरण्यात तात्पुरती मान्यता दिली आहे, अशी माहिती गृह विभागाच्या सूत्रांनी दिली.

  किशोर आपटे, मुंबई: एप्रिल २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय गृह विभागाने देशातील औद्योगिक कारखान्यांना त्यांचा संपूर्ण ऑक्सिजन पुरवठा(Oxygen Supply) वैद्यकीय कामासाठी देण्याचे फर्मान काढले होते. कोविड -१९ च्या प्रकोपाची दुसरी लाट(Corona Second Wave) त्यावेळी भरात होती. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी मिळेल तिथून प्राणवायू आणला जात होता. मात्र काल गृह मंत्रालयाने तूर्तास काही उद्योगांना त्यांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन (Oxygen Use) पुन्हा वापरण्यात तात्पुरती मान्यता दिली आहे, अशी माहिती गृह विभागाच्या सूत्रांनी दिली.

  तात्पुरत्या स्वरूपात प्राणवायू वापरण्यास अनुमती
  देशभरात कोविड-१९ ची दुसरी लाट झपाट्याने ओसरत असून रूग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे रूग्णांना आणिबाणीच्या वेळी लागणाऱ्या प्राणवायूची टंचाई त्यामुळे कमी झाली आहे. त्यामुळे ज्या उद्योगांना त्यांच्या उत्पादनासाठी ऑक्सिजनची गरज आहे अश्या विवक्षीत उद्योगांना तात्पुरत्या स्वरूपात प्राणवाय़ू वापरण्यास अनुमती दिली आहे. असे करताना त्यांच्या भागातील रूग्णांलयामध्ये ऑक्सिजनची कमतरता राहता कामा नये असेही या निर्देशात म्हटले आहे.

  उद्योगाचा प्राणवायू रूग्णांना
  याबाबत सूत्रांनी माहिती दिली की, एप्रिल महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात अवैद्यकीय कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या वापरावर सरकारने निर्बंध घातले होते. अनेक ठिकाण ऑक्सिजन वाहतूक शक्य होत नसल्याने औद्योगिक परिसराजवळ कोविड केंद्र सुरू करण्यात आली होती. जेणेकरून उद्योगासाठी तयार होणारा प्राणवायू रूग्णांना देता येईल. यामध्ये फक्त संरक्षण विभाग, औषध निर्मिती कारखाने लस निर्मिती उद्योग यांना वगळून सर्व उद्योगांचा प्राणवायू आरोग्याच्या कामासाठी घेण्यात आला होता.

  काही उद्योगांना तात्पुरती सूट
  आता सातत्याने कार्यरत उद्योग, फर्नेस रिफायनरी, धातू प्रक्रिया उद्योग, पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच संस्था लघु तसेच मध्यम उद्योग, उत्पादनक्षम उद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांना तात्पुरत्या स्वरूपात प्राणवाय़ू वापर पुन्हा सुरू करता येणार आहे. त्याबाबत आदेश काल निर्गमीत करण्यात आला आहे.

  या आदेशात म्हटले आहे की, डिपीआयआयटी (डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड  इंटरनल ट्रेड) च्या अनुमतीने द्रवित ऑक्सिजनचा  उल्लेखीत उद्योगाना तात्पुरत्या स्वरूपात करता येणार आहे. राज्य किंवा केंद्र शासीत प्रदेशांना तातडीने प्राणावायू कमतरता आढळून आली तर पुन्हा हा प्राणवायू प्राधान्याने त्यांना देण्यात येणार आहे. याबाबत प्राणवायू पुरवठा करताना प्रत्येक टप्प्यावर रूग्णालयांना त्याची कमतरता नसल्याची हमी द्यावी लागणार आहे.