कोंबड्या खपेनात, अंडी विकेनात, बर्ड फ्लूनं घातली चांगलीच भीती

महाराष्ट्रात बर्ड फ्लूची लागण झाल्याचं सरकारनं जाहीर केल्यानंतर कोंबड्या आणि अंडे या दोन्ही गोष्टींचा खप कमी होताना दिसत आहे. कोंबड्यांच्या विक्रीत ५० टक्क्यांनी तर अंड्यांच्या विक्रीत २० टक्के घट झालीय.

गेल्या काही महिन्यांपासून कोंबडी पालन व्यवसायावर सतत काही ना काही संकट येत आहे. हिवाळा हा चिकन आणि अंड्यांच्या खपासाठी सर्वोत्तम ऋतु समजण्यात येतो. मात्र यंदा हे चित्र वेगळं आहे.

महाराष्ट्रात बर्ड फ्लूची लागण झाल्याचं सरकारनं जाहीर केल्यानंतर कोंबड्या आणि अंडे या दोन्ही गोष्टींचा खप कमी होताना दिसत आहे. कोंबड्यांच्या विक्रीत ५० टक्क्यांनी तर अंड्यांच्या विक्रीत २० टक्के घट झालीय.

राज्यातील एकाही पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झालेली नसल्यामुळे चिकन खायला हरकत नाही, असा दावा नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीने केला आहे. महाराष्ट्रात २० हजारांच्या आसपास पोल्ट्री फार्म आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणूनही अनेकजण पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करतात.

बर्ड फ्लूमुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे कोंबड्या आणि अंड्यांचा खप घटलाय. देशात एकूण दहा राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. यामध्ये केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. गेल्या बुधवारपासून वेगवेगळ्या राज्यात ‘बर्ड फ्लू’ने पक्षी मरण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे बॉयलर चिकनचा सरासरी ८०  रुपयांवर असणारा महाराष्ट्रातील भाव आता ५८ रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे. अशाच प्रकारे विविध राज्यातील अंडी आणि चिकन यांचे भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहेत.

एका सर्वेक्षणानुसार भारतात इतर ऋतूंमध्ये साधारण १ कोटी ३० लाख कोंबड्यांची विक्री होत असते. मात्र हिवाळ्यात हे प्रमाणात १ कोटी ५० लाखांवर जातं. तर उन्हाळा आणि पावसाळ्यात सरासरी २० कोटी अंडी रोज विकली जातात. मात्र हिवाळ्यात हे प्रमाण २८ ते २९ कोटी पर्यंत पोहोचतं.