इंग्लंडमधील कोरोना योद्ध्यांना भारतीयांच्या अन्नछत्राचा आधार

नितीन देशमुख, पनवेल : मला भारतीय जेवणाची फारशी रुची नव्हती, परंतु मागील काही दिवसात भारतीय पद्धतीच्या शाकाहारी पदार्थांचा जेवणात समावेश झाल्याने माझा आहार पूर्णपणे बदलून गेला आहे. ही

नितीन देशमुख, पनवेल : मला भारतीय जेवणाची फारशी रुची नव्हती, परंतु मागील काही दिवसात भारतीय पद्धतीच्या शाकाहारी पदार्थांचा जेवणात समावेश झाल्याने माझा आहार  पूर्णपणे बदलून गेला आहे. ही प्रतिक्रिया आहे राणीच्या देशातील ,साहेबांच्या एका डॉक्टरची. लंडनमधील भारतीयांच्या सेवा डे या नोंदणीकृत विश्वस्त  संस्थेने इंग्लंडमध्ये एन. एच .एस. च्या रुग्णालयात काम करणार्‍या कोरोना योद्ध्यांना जेवण पुरवून सेवाभावी वृत्तीचे आणि  भारतीय संस्कृतीचे दर्शन साहेबांना घडवले त्यावेळी या डॉक्टरने वरील प्रतिक्रिया व्यक्त करून भारतीय जेवणाची प्रशंसा केली.   

 मार्चच्या उत्तरार्धात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले तेव्हा युकेमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी ‘सेवा डे’ला माहिती मिळाली की कोरोना विषाणूग्रस्त रूग्णांची काळजी घेणारे डॉक्टर आणि परिचारिका यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना चांगले  पौष्टिक जेवण मिळणे गरजेचे आहे. सेवा डेच्या पदाधिकाऱ्यांनी पश्चिम लंडनमधील वेस्ट मिडलसेक्स आणि हिलिंग्डन रुग्णालय या दोन  स्थानिक रुग्णालयात संपर्क साधला असता त्यांना पौष्टिक जेवणाची आवश्यकता असल्याचे समजले. लंडनच्या पश्चिमेस हॉन्स्लो, स्लो, रिडिंग, बेसिंगस्टोक आणि इतर शहरांमध्ये  सेवा डेने संपर्क साधून आपल्या  स्वयंसेवकांना एकत्र केले आणि स्लाव्हमधील हिंदू मंदिरात सेवा स्वयंपाकघर सुरु करण्याचे ठरले. स्लाव्ह हिंदू मंदिरानेही या उपक्रमास त्वरित संमती दिली व जेवण बनवण्यासाठी  लागणारे आपले साहित्य व धान्य भांडार खुले केले. सेवा डे ने या कार्यासाठी  देणगी गोळा करण्यास सुरुवात केली.  तेव्हा विविध हिंदू समुदाय; लंडनच्या पश्चिम भागात स्थायिक झालेल्या तेलगू, महाराष्ट्रीयन, गुजराती, पंजाबी, बंगाली आणि इतर देशातील नागरिकांनी  उदारपणे अन्न आणि पैशाची देणगी दिली आणि. भाजीपाला निवडून कापण्यापासून , स्वयंपाक करणे, पॅक करणे, पोचविणे या सर्व प्रकारच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवकांचे हात पुढे आले. सेवा डे ने खात्री करुन दिली की स्वयंपाकघर आठवड्यातून ७ दिवस चालवले जाईल. स्थानिक हिंदू समुदायाच्या स्वयंसेवकांनी पीपीई आणि सामाजिक अंतर पाळून  मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करून सरकारी नियमांचे पालन केले .

 सेवा डे वेस्ट लंडन विभागाचे समन्वयक सुहास माढेकर म्हणतात , जेव्हा आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात केली तेव्हा आम्ही दिवसाला २०० लोकांचे जेवण बनवत होतो. दुसर्‍या आठवड्याच्या अखेरीस, दैनंदिन डब्यांचा आकडा  ५०० वर जाउन पोहोचला.  आमच्या सर्व स्वयंसेवकांचा मला खूप अभिमान आहे. त्यांच्यामुळे आम्ही २०,०००  कोरोना योध्द्याना जेवण देण्यास  सक्षम झालो. एनएचएस कर्मचाऱ्यांनी  सेवा डे च्या कार्याचे कौतुक केले. सेवा डेला दोन रुग्णालयांनी खास कार्ड पाठवून सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले. त्यामध्ये डॉ गुप्ता यांनी लिहिले आहे की  आजची करी खूप चवदार आहे .आम्ही कर्मचारी आपले खूप कृतज्ञ आहोत सर्व स्वयंसेवकांचे खूप आभार. खरोखरच चांगले अन्न जसे घरातील भोजन. खुप आभार.

 सेवा डे त्यांच्या सेवा किचन सर्व्हिंग जेवणाच्या व्यतिरिक्त हेल्प अँड नेबर मोहिमेअंतर्गत, स्वयंसेवक,स्थानिक परिषद आणि इतर संस्थांसमवेत वृद्ध, बेघर आणि असंरक्षित लोकांसाठी ( जे खरेदीसाठी बाहेर जाऊ शकत नाहीत )फुड पार्सल वितरित करण्याचे कार्य करतात. असंरक्षित  कुटुंबांसाठी १२०० हून अधिक खाद्यपदार्थाचे पार्सल दिले आहेत. विद्यापीठे व वसतिगृह बंद झाल्यावर अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते . त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा आणि खाण्यासाठी अन्न ही नव्हते. इंडियन नॅशनल स्टूडंट्स असोसिएशनने  (आयएनएसए)  सेवा डे बरोबर संपर्क साधल्यावर  या विद्यार्थ्यांना निवास आणि भोजन उपलब्ध करुन देण्यात आले. सेवा डे स्वयंसेवकांनी फार्मासिस्टला एप्रिल आणि मे २०२० मधील लॉकडाऊन दरम्यान अत्यावशक औषधे असंरक्षित  लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. ह्या कार्यास आम्हाला संघटना, समुदाय गट, स्वयंसेवक, वैयक्तिक घरे आणि मंदिरे यांनी दिलेल्या सर्व सहकार्या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, त्यांच्याशिवाय  आम्हाला ही महान सेवा करणे शक्य झाले नसते असे समन्वयक  सुहास माढेकर यांनी सांगतात 

 सेवा डे ही इंग्लंडमध्ये नोंदणीकृत विश्वस्त संस्था आहे. सेवा ही एक वैश्विक संकल्पना आहे, ज्यात बक्षिसाची अपेक्षा न करता दयाळूपणे वागणे समाविष्ट असून हे कार्य  नि:स्वार्थपणे आणि कोणत्याही हेतूशिवाय केले जाते. त्यांचे कार्य तीन मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे. दारिद्रय , संकटांचे निवारण,पर्यावरणाचे रक्षण व छोट्या कृतीतून आनंद पसरविणे सेवा डे लहान मुलांना चित्र रेखाटणे, चित्रकला आणि इतर संदेश तयार करण्यास शिकवते. वृद्धांची काळजी घेते आणि त्यांचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करते