आजारपणानंतर शरद पवारांची कामाला सुरुवात, १ जूनला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची झाडाझडती बैठक

दोन महिन्यांच्या आजारपणानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी(Sharad Pawar) कामाला सुरुवात केली आहे. येत्या १ जून रोजी ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक(Rashtrawadi congress Meeting) घेवून केलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत.

  मुंबई: महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांत कुरबूरी सुरू झाल्याचे दिसत आहेत. त्यामधून ज्येष्ठ नेते म्हणून मार्ग काढण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर आहे. आता दोन महिन्यांच्या आजारपणानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी(Sharad Pawar) कामाला सुरुवात केली आहे. येत्या १ जून रोजी ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक(Rashtrawadi congress Meeting) घेवून केलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत.

  महत्वाच्या आढावा बैठका
  मंत्र्यांच्या बैठकीनंतर ते राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. मागील काळात  धनंजय मुंडे याच्यावर त्यांच्या तिसऱ्या पत्नीने आरोप केले होते. तर राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप झाल्याने राष्ट्रवादी आणि महविकास आघाडी अडचणीत आली होती या पार्श्वभुमीवर रिक्त मंत्र्याची पदे भरण्याबाबत जुलै महिन्यात अधिवेशनापूर्वी पक्षाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या करीता या आढावा बैठका महत्वाच्या आहेत.

  जयस्वाल नेमणूकीचा संदर्भ
  दरम्यान शरद पवार यानी काल सायंकाळीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याची वर्षा निवासस्थानी जावून सुमारे पाऊण तास चर्चा केली. या चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला तरी त्याबाबत माध्यमांतून काही माहिती देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणाकडून केल्या जाणाऱ्या कारवाई संदर्भात पवार यांच्याशी मुख्यमंत्र्याची चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  जयस्वाल यांचे देशमुख यांच्याशी मतभेद
  सीबीआयच्या प्रमुख पदावर राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची कालच नियुक्ती झाली, त्यानंतर राज्यात सिबीआय कडून अनील देशमुख प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीला वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जयस्वाल यांचे राज्यात महासंचालक असताना देशमुख यांच्याशी मतभेद होते तसेच रश्मी शुक्ला यांच्या कथीत टॅपिंग प्रकरणात जयस्वाल यांचा संदर्भ असल्याने या प्रकरणात आता सीबीआय कडून नव्याने काही हालाचाली होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता सूत्रानी व्यक्त केली आहे.

  याशिवाय पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसच्या आक्रमक भूमिका, राज्यातील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या उद्योग व्यापाराच्या मुद्यांवर देखील चर्चा झाल्याचे या सूत्रांनी सांगितले.