uddav thackery and sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते. महाविकास आघाडीत(Mahavikas Aghadi) गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. जवळपास तासभर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानावरून महाविकास आघाडीत सध्या नाराजी आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीबाबतही खलबतं सुरु आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणूक कशी पार पडेल? या संदर्भातही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या चर्चेतील तपशील सध्या गुलदस्त्यातच आहे. या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीत या विषयांवर काही चर्चा झाली का? याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे.

  महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस सातत्याने स्वबळाचा पुनरुच्चार करत आहे. तर पक्षश्रेष्ठीकडून अद्याप ठरलं नसल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे इतर दोन पक्षात चलबिचल होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेमकं धोरण काय, अशी चर्चाही सुरू आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पाच महिने राज्य विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे.

  अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अशा दोन अधिवेशनांमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने टाळली. अध्यक्षपद काँग्रेसकडेच कायम राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली असतानाही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अध्यक्षपदाची निवडणूक टाळली जात असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आक्षेप आहे.

  दबावतंत्राबाबत कानमंत्र दिल्याची शक्यता
  दुपारी अचानक सह्याद्री अतिथीगृहावर कृषीविषयक बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे देखील तेथे पोहोचले. खडसे यांच्या पत्नी मंदाकीनी यांना इडीने नुकतेच समन्स बजावले अहे. तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याही पत्नीला ईडीने चौकशीला बोलावले आहे. त्यामुळे पवार यांनी  मुख्यमंत्री आणि आघाडीच्या नेत्यांना येत्या काही दिवसांत होवू घातलेल्या दबावतंत्राबाबत कानमंत्र दिला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  केंद्राच्या तीन कृषी कायद्यातील सुधारणा विधेयके
  दोनच दिवसांपूर्वी त्यांची काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली मात्र या भेटीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बाजुला ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज आघाडीच्या अन्य घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली त्यात राज्य विधिमंडळात काँग्रेसच्या पुढाकाराने मांडण्यात आलेल्या केंद्राच्या तीन कृषी कायद्यातील सूधारणा विधेयकाना तिव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडी मधील घटकपक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले.

  सहकारात बदलाच्या प्रस्तावांची शक्यता
  येत्या सोमवारपासून संसदेचे पावसाळी सत्र सुरू होत आहे. त्यात नव्या मंत्र्यासह नव्या सहकार खात्याचा कार्यभार असणा-या अमीत शहा यांच्याकडून सहकारात बदल करणाऱ्या काही कायद्याच्या प्रस्तावांची शक्यता आहे. त्याबाबत संसदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची काय भुमिका असावी याबाबत पवार आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे मानले जात आहे. या शिवाय येत्या काही दिवसांत, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि महामंडळ वाटपाच्या मुद्द्यावर घटकपक्षांना पटेल अश्या प्रकारे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे त्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  बारामतीमध्ये ओबीसी बैठकीचे आयोजन
  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार दिल्लीत असताना पुढील आठवड्यात थेट बारामतीमध्ये ओबीसी बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भुमिका ठरविण्याबाबत चर्चा अपेक्षीत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणून एका पक्षाला आपल्यासोबत घेत सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

  मराठा, ओबीसी आरक्षण मुद्दे संसदेत महत्वाचे
  येत्या सोमवारी संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रातील, महाविकास आघाडीच्या खासदारांची भूमिका काय असावी? कोणते मुद्दे उपस्थित करावेत? या पार्श्वभूमीवर पवार यांची भेट असावी असे मानले जात आहे. राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे मुद्दे संसदेत महत्वाचे आहेत. या बैठकीत त्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.