udhav thackrey

  • ठाकरे सरकार पडले तोंडघशी

मुंबई.  केंद्र सरकारची तीन कृषी विधेयके महाराष्ट्रात सक्तीने लागू करण्याचे आदेश ऑगस्टमध्येच निघाल्याचा गौप्फोट झाल्याने ठाकरे सरकार कैचीत सापडले आहे. राज्याच्या विपणन संचालकांनी १० ऑगस्ट रोजी तीन विधेयकांची सक्तीने अंमलबजावणी करण्याची अधिसूचना काढली होती. आयएएनएस या वृत्तसंस्थेने हा गौप्यस्फोट केला आहे. विशेष म्हणजे केंद्राची कृषी विधेयके राज्यात लागू न करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या खात्याने परस्पर काढलेल्या या अध्यादेशाने महाआघाडी सरकारची गोची झाली आहे.

केंद्राच्या कृषी विधेयकांविरुद्ध देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. विधेयकांबाबत शिवसेना व राष्ट्रवादीची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. काँग्रेसने मात्र विरोधात भूमिका घेतलेली आहे. दरम्यान, सहकारमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी आदेश निघाल्याचे मान्य केले, मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर परिस्थिती बदलली आहे, अशी मखलाशी केली आहे.

सहकारमंत्र्यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतरच ऑगस्टमध्ये निघाला अध्यादेश

केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी अध्यादेश तत्काळ काढण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. त्यानंतर तीन  विधेयकाची पडताळणी करण्यासाठी विधी विभागाकडे पाठवण्यात आली.विधी विभागाने पडताळणी केली आणि केंद्राची विधेयके लागू करण्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला विधी विभागाने दिला होता. त्यावर संबंधित मंत्र्यांनी (बाळासाहेब पाटील) हिरवा कंदील दिल्यानंतरच महाराष्ट्रात आदेश काढण्यात आले, असे एका आयएएस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.