धक्कादायक ! जन्मदात्या पित्यानेच केला नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

दुपारच्यावेळी घरात खेळत असलेल्या अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या पित्यानेच बलात्कार केल्याची लांच्छनास्पद व किळसवाणी घटना घडली आहे

ओतूर: माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पिंपरी पेंढार येथे घडली आहे. दुपारच्यावेळी घरात खेळत असलेल्या अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या पित्यानेच बलात्कार केल्याची लांच्छनास्पद व किळसवाणी घटना घडली आहे. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून पित्याच्या कृतीचा राग व्यक्त केला जात आहे.

ओतूर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर – कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता.जुन्नर) येथे पीडित मुलगी व तिचे कुटुंब राहते आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी घरात एकटीच खेळत होती. त्यावेळी आजूबाजूला कुणी नसल्याचा फायदा घेत मुलीच्या वडिलांनी हे दुष्कृत्य केले. वडिलांनी केलेल्या कृतीची माहिती मुलीने आईला दिली. या घटनेची माहिती समजताच पीडित मुलीच्या आईने तात्काळ ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास ओतूर पोलीस करत आहेत.