कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरच्या सराफाने नवरा- नवरीसाठी बनविले चक्क चांदीचे मास्क

समीर मुजावर, कोल्हापूर :गेल्या दीड महिन्यापासून काम नाही,दुकान बंद करून घरी बसलेल्या एका सराफाने समाज प्रबोधन करण्यासाठी चक्क चांदीचा मास्क बनवला. आता लग्नसराईत या मास्कला चांगलीच मागणी येऊ लागल्याचे

समीर मुजावर, कोल्हापूर :गेल्या दीड महिन्यापासून काम नाही,दुकान बंद करून घरी बसलेल्या एका सराफाने समाज प्रबोधन करण्यासाठी चक्क चांदीचा मास्क बनवला. आता लग्नसराईत या मास्कला चांगलीच मागणी येऊ लागल्याचे कोल्हापुरच्या गुजरी येथील सराफ संदीप सांगावकर यांनी नवराष्ट्र प्रतिनिधीला सांगितले.

कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर यापुढे हँड सॅनिटायझर,हँड वॉश आणि नाकावर मास्क लावणे अनिवार्य आहे.पण ज्याने हे जाणले त्याला नक्कीच त्याचा फायदा आहे. राज्य सरकार ,जिल्हा प्रशासन हेच वारंवार सांगत आहे. जे काळजी घेतात ते कोरोनापासून दूर आहेत. ज्यांनी निष्काळजीपणा केला त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यामुळे कित्येकांना त्रास सहन करावा लागला हे आपण जाणतोच. याच कोरोनाच्या थैमानामुळे गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे ठप्प आहे. कोरोनाला हरवण्यासाठी यापुढे मास्कची अनिवार्यता लक्षात घेऊन संदीप सांगावकर या कोल्हापूरच्या सराफाने अतिशय सुंदर नक्षीकाम असणारे आणि लग्नसराईत नवरा नवरीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या झगमगाटात आणखीन भर घालणारे ५० ग्रॅम वजनाचे चक्क चांदीचे मास्कच बनवले आणि या लाईटवेट चांदीच्या मास्कला सर्व थरातून मागणी वाढू लागली. त्यामुळे लॉकडाऊनमुळे थंडावलेला सोन्या चांदीच्या व्यवसायाला किमान थोडीशी उभारी तरी संदीपच्या या कल्पनेने मिळाली आहे.

चांदीचे मास्क बनवल्यानंतर आठवडाभरात तब्बल ५ ते ६ कुटुंबियांनी आपल्या घरच्या विवाहात  नवरा-नवरीसाठी हे २४०० ते २५०० रुपये किमतीचे मास्क खरेदी केले आहेत आणि या मास्कची चर्चा होईल तशी त्याची मागणीही वाढू लागल्याचे सराफ संदीप सांगावकर यांनी नवराष्ट्रशी बोलताना सांगितले. सराफ संदीपच्या मते चांदीचे मास्क दैनंदिन जीवनात सर्वसामान्य माणूस वापरु शकत नाही, पण एखाद्या आठवणीत राहणाऱ्या विवाहासारख्या प्रसंगात असे मास्क यापुढे नक्कीच प्रचलित होतील अशी परिस्थिती सध्यातरी जीवघेण्या कोरोना विषाणुमुळे निर्माण झाली आहे.त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात,गुढीपाडवा अक्षय्य तृतीया यासारखे सगळे मुहूर्त हातचे गेल्याने हताश झालेल्या संदीप सांगावकर यांना बसल्या बसल्या सुचलेली चांदीच्या मास्कची संकल्पना आता लोकांनाही रुचली आहे.व्हॉट्सअॅपवरून जोरदार व्हायरल झालेल्या या चांदीच्या मास्कची चर्चाही जोरदार सुरू आहे आणि यातून एक प्रकारे कोरोना विषाणूची बाधा होवू नये यासाठी घ्यावयाच्या काळजी बद्दल सुद्धा लोकांचे प्रबोधन व्हायला मदत होणार आहे. पण या चांदीच्या मास्कमूळे यापुढे लग्नाच्या फोटोचे अल्बम सुद्धा पाहताना अशा अनोख्या मास्क मधील नवरा नवरी कोरोनाच्या काळाचे दाखले आयुष्यभर नातेवाईक, मित्रमंडळींना देतील यात शंका नाही.