st bus for palkhi

कोरोना प्रतिबंधाच्या नियमामुळे(Corona Rules) आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी किंवा देहू येथून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी एसटी बसमधून पंढरीत दाखल झाली. या बसचं सारथ्य करणाऱ्या चालकांनाही(St Driver) या भक्ती सोहळ्यात सहभाग होता आलं.

    पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली असतानाच वारकऱ्यांची टाळ मृदंगाच्या साथीने सुरु असलेली भजने, प्रसन्न वातावरण आणि ‘भक्तीरथा’चं सारथ्य करण्याची संधी मिळाली आणि भरुन पावलो, ही भावना आहे, परिवहन महामंडळाच्या चालकांची.

    पंढरपूर म्हणजे भक्तीचा पूर, पंढरपूर म्हणजे भक्तांची मांदियाळी, माऊलीची आणि लाखो वारकऱ्यांच्या भेटीचा सोहळा. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे पंढरीची वारी घरुनच विठ्ठलाला हात जोडून करण्याची वेळ वारकऱ्यांवर आली. कोरोना प्रतिबंधाच्या नियमामुळे आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी किंवा देहू येथून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी एसटी बसमधून पंढरीत दाखल झाली. या बसचं सारथ्य करणाऱ्या चालकांनाही या भक्ती सोहळ्यात सहभाग होता आलं. हा अनुभव अभूतपूर्व होता, अशी त्यांची भावना आहे. पंढरपुरात दाखल झालेल्या महामंडळाच्या दहा बसच्या चालकांपैकी काही चालकांची प्रातिनिधीक प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे.

     आई वडीलांची पुण्याई !
    आजचा दिवस माझ्यासाठी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे. माझ्या आई वडीलांच्या पुण्याई मुळेच माऊलींच्या पालखीचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभलं… मागील १३ वर्षांपासून मी एसटी महामंडळात कार्यरत आहे. वेगवेगळे प्रसंग अनुभवले हजाराे लाेकांबराेबर संपर्क आला, ज्यातून अनेक चांगले वाईट प्रसंग अनुभवले… पण आजचा दिवस मला व माझ्या कुटुंबासाठी ‘‘साेन्या सारखा दिवस आहे’’. कधीही न विसरण्यासारखा दिवस लाभला… विठू माऊलीचेही दर्शन घेतले. अनेक वर्षांपासून मी  पुण्यात स्थायिक आहे. माऊलीच्या वारीचं ‘‘याची देही याची डाेळा दर्शन’’ व अनुभव आयुष्यभराचं पुण्य आहे. वारीचा सारथी बनविल्याकरीता महामंडळाचा मी ऋणी आहे. – लक्ष्मण शिरसाठ , चालक – श्री संत माऊली पालखी आळंदी

    पुण्य मिळालं
    ‘‘ आज मी धन्य झालाे….इतक्या वर्षात कधीही मी पंढरपूरला कधीही गेलाे नाही. आज पुण्य मिळालं ‘‘ आयुष्यभरासाठी माउलीने मला अनमाेल असा ठेवा दिला. माउलीने वारीला बाेलविलं आणि माउलीच्या पालखीचा सारथी बनण्याचं पुण्य लाभलं. १९९९ पासून मी एसटी महामंडळात काम करत आहे. मुळशी येथे माझ्या कुटुंबाबराेबर गुण्या-गाेविंदाने राहत आहे. पण आजचा आनंदाचा दिवस आहे. सकाळी विठू माउलीचंही दर्शन घेतलं. आता पुढच्या वर्षी मी आणि माझं कुटुंब पायी विठू माऊलीच्या दर्शनाला येवू असं साकडचं घातलं आहे. माउलीचा आशिर्वाद असाच आमच्यावर असाे, हिच माऊलीच्या चरणी प्रार्थना… आणि मी महामंडळाचे ऋणी आहे. – रामचंद्र ईघारे, चालक – श्री संत माऊली पालखी आळंदी

    आजचा दिवस म्हणजे आई-वडीलांची पुण्याईच !
    माझे आजाेबा पंढरपूरची पायी वारी करायचे त्यांचा वसा पुढे वडीलांनी चालवला. वडील वयाेमानाने थकले. शिवाय मागील दाेन वर्षांपासून काेराेनामुळे वारीही बंद आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा सारथी बनण्याचे मला हे पुण्य लाभलं.आई वडीलांच्या पुण्याई मुळेच हे भाग्य मला लाभलं. मागील सात वर्षांपासून मी एस टी महामंडळात कार्यरत आहे. अवसरी खुर्द तांबडे मळा, तालुका आंबेगाव येथे कुटुंबासाेबत राहत आहे. विठू माउलीचंही दर्शन घेतलं धन्य झालाे.
    – श्रीरंग भगवान तांबडे, चालक – श्री संत तुकाराम महाराज पालखी, देहू

    आजच्या दिवसाच्या वर्णनासाठी शब्द ताेकडे….
    आजचा दिवस माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे. आयुष्यभर पुरेल एवढा आनंद आज पालखी साेहळ्यामुळे मिळाला आहे. या आनंदाचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाही. माझे आजाेबा नियमित वारी करत असतं त्यानंतर वडीलही वारकरी संप्रदायाचे हाेते. आज महामंडळामुळे मलाही वारीचं भाग्य लाभलं. मागील सात वर्षांपासून मी महामंडळात कार्यरत आहे. शिंगवे पारगाव तालुका आंबेगाव येथे कुटुंबासमवेत राहत आहे. आजाेबा-वडीलांची पुण्याई ज्यामुळेच मला आजचा दिवस व आनंद भरभरुन मिळाला. – विकास गाेरडे, चालक – श्री संत तुकाराम महाराज पालखी, देहू