एस.टी.च्या मालवाहू बसच्या ५४३ फेऱ्यांमधून झाली ३ हजार टन मालवाहतूक, २१ लाख रुपयांचे उत्पन्न

मुंबई : राज्यात प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत ७२ बसेस मालवाहतूकीसाठी तयार झाल्या आहेत. एस.टी महामंडळाच्या ताफ्यात

मुंबई : राज्यात प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत ७२ बसेस मालवाहतूकीसाठी तयार झाल्या आहेत. एस.टी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक बस (ट्रकमध्ये रुपांतरीत) कार्यरत आहेत. म्हणजेच आजघडीला ३७२ बसेस मालवाहतूकीसाठी उपलब्ध असून जनसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लोकप्रिय असलेली लालपरी आता मालवाहतूकीच्या क्षेत्रातही नवी भरारी घेतांना दिसत आहे. विश्वासार्हता आणि सुरक्षितता या दोन प्रमुख गोष्टींमुळे राज्यभरातून एस.टीने मालवाहतूक करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे एस.टी महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रुपाने नवसंजीवनी मिळत आहे. २१ मे पासून आतापर्यंत मालवाहतूक एस.टीने ५४३ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार टन मालाची वाहतूक राज्याच्या कानाकोपऱ्यात केली आहे. त्यासाठी ९० हजार कि.मीचा प्रवास या वाहनांनी केला असून त्यापोटी महामंडळाला २१ लाखांचे उत्पन्नदेखील मिळाले आहे.

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एस.टी महामंडळाच्या बसेसकडे पाहिले जाते. गाव तिथे एस.टी असा जिचा आदराने उल्लेख केला जातो त्या एस.टी बसेसने अगदी लॉकडाऊनच्या काळात ही आपला सेवाभाव जपत परराज्यातील ५ लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवले. तब्बल १५२ लाख किलोमीटर प्रवास या बसेसने केला. सर्वसामान्यांच्या प्रवासी सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या आपल्या लालपरीने प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीत पदार्पण केले असून त्याचा लाभ कोरोनाच्याकाळात सर्वाधिक झाला. एसटीची थांबलेली चाके मालवाहतूकीसाठी राज्यभर धावली.
 
एसटी महामंडळ आपल्या बसेसमधून  व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकते, त्यासाठी आवश्यकतेनुसार जुन्या एसटी बसेसमध्ये बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू वाहनांमध्ये  करण्यात येत आहे. ज्या प्रवासी वाहनांचे विहित आयुर्मान  (६.५ लाख किमी आणि १० वर्षे पूर्ण झालेल्या)  पूर्ण झाले आहे, अशा प्रवासी वाहनांच्या अंतर्गत रचनेत बदल करून ही वाहने मालवाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या  १८ मे २०२० रोजीच्या मान्यतेनंतर मालवाहतूक बसचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या विविध भागातून अन्नधान्य, बि-बियाणे, खते, भाजीपाला, कृषी उत्पादने यासोबत लोखंडी पाईप, रंगाचे डबे, अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूक मालवाहू एस.टीमधून केली जात आहे. 
एसटी महामंडळाचे राज्यात २५० आगार आहेत. जवळ जवळ प्रत्येक तालुकास्तरावर हे आगार कार्यरत आहेत. याबरोबर ३१ विभागीय कार्यालये, ३३ विभागीय कार्यशाळा असा महामंडळाचा मोठा विस्तार भविष्यात एसटीच्या मालवाहतुकीला पाठबळ देणारा आहे.
सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर एसटीने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून त्यांच्या मार्फत एम.आय.डी.सी.,कारखानदार, लघुउद्योजक, कृषिजन्य वस्तूंचे व्यापारी यांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांना एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये शासनाचे अनेक महामंडळे,व्यापारी आपला माल एसटीच्या मालवाहतुक सेवेतून  पाठविण्यास उत्सुक आहेत. पुणे, नाशिक, सातारा, सांगली,जळगांव, गडचिरोली, रत्नागिरी व कोल्हापूर या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. माफक दर, सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतुकीला भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.