यंदापण घागर उताणीच, राज्य सरकारने नाकारली दहीहंडी उत्सवाची परवानगी

राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये(Maharashtra) दहीहंडी आयोजित करण्याला परवानगी(State Government Rejects Permission To Dahihandi) नाकारली आहे.

    राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये(Maharashtra) दहीहंडी आयोजित करण्याला परवानगी(State Government Rejects Permission To Dahihandi) नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात उत्सवाला परवानगी मागण्यात आली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असं या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितलं.

    दहीहंडी साजरी केल्याने कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो असं टास्क फोर्सने सांगितलं असल्याचे सरकारने स्पष्ट केलं. हा उत्सव जागतिक स्तरावर टीकावा अशी बाजू समन्वय समितीने मांडली. गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. मात्र बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही हे समन्वय समितीच्या सदस्यांना समजावून सांगितलं.

    एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही गोविंदा पथकांवर लक्ष कसं ठेवणार. यंत्रणांवरील ताण वैगेरे पाहता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आवाहन केलं आहे. परवानगी नसल्याने आम्ही दहीहंडीचं आयोजन न करण्याची भूमिका घेणार आहोत, असं समन्वय समितीने सांगितलं आहे.

    यंदा कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर दहीहंडीला आणि इतर उत्सवांना काही प्रमाणात परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली.दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरु झाली. वेगवेगळ्या दहीहंडी मंडळांनी राज्य सरकारने छोट्या प्रमाणात का असेना दहीहंडी साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केलेली. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडली.