कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचा राज्य सरकारचा दावा, आरोग्यविषयक उपाययोजना आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे अशक्यही झाले शक्य

राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात(Corona Second Wave In Control) आलेली आहे. राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरिकांचे सहकार्य याचा हा परिणाम असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

  मुंबई: कोविड साथरोग आटोक्यात(Covid-19) आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरिकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात(Corona Second Wave In Control) आलेली आहे. आज नंदूरबार जिल्हयात एकही कोरोनाचा सक्रिय रुग्ण(Zero Covid Patient In Nandurbar) नाही. नजीकच्या काळात येणारे विविध सण व उत्सव लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना जसे मास्कचा वापर, हाताची स्वच्छता व सुरक्षित शारिरीक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊन नागरीकांचा कोविड प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी नागरिकांनी भविष्यात देखील असेच सहकार्य करावे असे आवाहन करण्यात राज्य मंत्रिमंडळाच्या आढावा बैठकीनंतर सरकारने केले आहे.

  सहा जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी
  याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार,राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे. राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे. सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग हे आहेत.

  रुग्णबाधेचा दर २.४४ टक्के
  राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) २.४४ टक्केइतका आहे. राज्यात गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापि, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्हयांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.

  पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस
  राज्यात आज घडीला पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आलेले आहेत. राज्यातील ४५ वयोगटावरील जवळपास ५० टक्के नागरीकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. १८ ते ४४ वयोगटातील जवळपास २५ टक्के नागरिकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. राज्यातील एक कोटी तेहतीस लाख सात हजार नागरीकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या आहेत हा देशातील उच्चांक आहे. तसेच दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यात एकाच दिवशी नऊ लाख चौसष्ट हजार नागरीकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. हा देखील महाराष्ट्रातील उच्चांक आहे. राज्य नागरीकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आर्थिक गतीविधींना चालना देण्याचाही प्रयत्न करीत आहे. यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत.