श्रीवर्धन तालुक्यात कडक लॉकडाऊन, श्रीवर्धन बाजारपेठ पोलिसांनी केली सील

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यात व शहरात आजपासून अत्यंत कडक लॉकडाउनला सुरुवात झाली आहे. तीन आसनी रिक्षा व सहा आसनी रिक्षा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. पेट्रोल पंपावरसुद्धा फक्त शासकीय कर्मचारी त्याचप्रमाणे आरोग्य सेवक, तसेच सेवा देणाऱ्या विविध आस्थापना, पत्रकार यांनाच इंधन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल रात्री बारा वाजल्यापासून सुरू झालेला हा लॉकडाऊन सव्वीस तारखेला रात्री बारा वाजता संपणार आहे.

तीन जूनला श्रीवर्धन तालुक्यात चक्रीवादळ धडकल्या नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रत्येकाच्याच घरावरील छप्पर उडाले होते व वाडीतील नारळ, सुपारीची झाडे पूर्णपणे पडून गेली होती. त्यामुळे नागरिक कोरोनाला विसरले होते. परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून श्रीवर्धन शहरात कोरोनाचे अनेक रुग्ण सापडले गेल्यामुळे श्रीवर्धनच्या नागरिकांना आज धडकी भरली आहे. श्रीवर्धन शहरातील एका पत्रकाराला देखील कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्याला आता इस्पितळातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु या पत्रकाराच्या कुटुंबाचे स्वॅब घेण्यात आले होते. या पत्रकाराचे संपूर्ण कुटुंब देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आता समोर आले आहे. श्रीवर्धन पोलिसांनी संपूर्ण बाजारपेठ सील करून टाकली आहे. शिवाजी चौक येथे बॅरिकेट्स लावले आहेत तर भाजी मार्केट जवळ देखील बॅरिकेट्स लावून पूर्णपणे बाजारपेठेत जाण्याचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. फक्त भात लावणीची कामे जोराने सुरू असल्यामुळे शेतीची कामे करणाऱ्यांना या बंदमधून सूट देण्यात आली आहे.

जे नागरिक मास्क वापरणार नाहीत किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकतील तर त्यांना पाचशे रुपये दंडाची तरतूद या बंदच्या आदेशामध्ये करण्यात आली आहे. किराणा सामान व भाजी घरपोच देण्यासाठी काहीजणांनी आपले नंबर दिले आहेत. आजपासून पावसाने देखील दमदार सुरुवात केल्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर येण्याचे जवळजवळ टाळल्याचे पाहायला मिळत होते. श्रीवर्धन शहरात आज नवीन १२ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात देखील भात लावणीची कामे सुरू असल्यामुळे शेतीच्या कामासाठी जाणाऱ्याना सूट देण्यात आली आहे  रिक्षाचा वापर केवळ आजारी माणसांना नेण्यासाठी करण्यात येणार आहे. येत्या २६ तारखेपर्यंत नागरिकांनी अशाच प्रकारे लॉकडाऊनला सहकार्य करावे,असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.