मुंबई विद्यापीठ दुसरी पेट परीक्षा कधी घेणार ? विद्यार्थी संघटनेचा सवाल

मार्च २०२१ मध्ये झालेल्या अधिसभा बैठकीमध्ये पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) (PET)वर्षातून दोन वेळा घेण्याचे प्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णी(Ravindra Kulkarni) यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मार्चमध्ये पहिली पेट परीक्षा(Pet Exam) झाली. मात्र दुसऱ्या पेट परीक्षेबाबत विद्यापीठाकडून अद्याप कोणतीही सूचना जारी करण्यात आली नाही.

    मुंबई: मुंबई विद्यापीठामध्ये(Mumbai University) संशोधनाला(Research) चालना मिळावी यासाठी मार्च २०२१ मध्ये झालेल्या अधिसभा बैठकीमध्ये पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) (PET)वर्षातून दोन वेळा घेण्याचे प्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मार्चमध्ये पहिली पेट परीक्षा झाली. मात्र दुसऱ्या पेट परीक्षेबाबत विद्यापीठाकडून अद्याप कोणतीही सूचना जारी करण्यात आली नाही. त्यामुळे वर्षातील दुसरी पेट परीक्षा कधी घेण्यात येणार ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

    मुंबई विद्यापीठामध्ये संशोधनावर कमी भर दिला जातो. त्यातही ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करून पीएचडी करायची असते अशा विद्यार्थ्यांसाठी वर्षातून एकदाच पेट परीक्षा घेण्यात येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी मार्चमध्ये ऑनलाईन झालेल्या अधिसभेमध्ये पेट परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याची मागणी केली. यावर अधिसभा अध्यक्ष प्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णी यांनी पेट परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचे मान्य केले. मार्च २०२१ मध्ये झालेली पेट परीक्षा ही तीन वर्षाने झाल्याने या परीक्षेला महाराष्ट्रातून तब्बल ६५१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये परराज्यातून ४६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

    मुंबई विद्यापीठाच्या २०२१ मधील पहिल्या पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या पेटला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतरही विद्यापीठाकडून या वर्षातील दुसरी पेट परीक्षा घेण्यासंदर्भात तारीख जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरी पेट परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठाकडे विचारणा होत आहे. मात्र अद्यापही पेट परीक्षेबाबत कोणताही निर्णय विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला नाही. दुसऱ्या पेट परीक्षेची तारीख जाहीर केल्यास मार्चमधील पेट परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले तसेच नवीन विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीमध्ये सातत्य ठेवता येणार आहे. पीएचडीसाठी आवश्यक असलेल्या पेट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी ही परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केली आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये परीक्षा झाल्यास संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे विनंतीवजा पत्र थोरात यांनी विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना लिहिले आहे.