१४ दिवसांचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होईल, अशी ठाकरे सरकारला भीती – मुनगंटीवारांनी लगावला टोला

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी १४ दिवसाचं अधिवेशन (Rainy Session Of Assembly)झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला(Thakre Government) भीती वाटत असल्याची घणाघाती टीका केली आहे.

    मुंबई : कोरोनाचे कारण देत महाविकास आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी १४ दिवसाचं अधिवेशन (Rainy Session Of Assembly)झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला(Thakre Government) भीती वाटत असल्याची घणाघाती टीका केली आहे.

    “ठाकरे सरकारला भीती वाटतेय. ४ दिवसांचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अधिवेशन जर १४ दिवसाचं झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकते”, असा जोरदार टोला मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

    नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत, दुसरीकडे अद्याप विधानसभा अध्यक्षांनी निवड झाली नाही, याबाबत विचारलं असता, ‘या तीन पक्षांमध्ये नाराजी होऊच शकत नाही. कारण, एकदा सत्तेची चटक लागली की नाराजी दोन दिवसांपुरती उरते. १९ तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधींचा वाढदिवस होता, त्या दिवशी केक खाऊ घालायचे, त्याच दिवशी जोडे खाऊ घालायची भाषा झाली. मी याकडे लक्ष देत नाही. या तीन पक्षांमध्ये कोण नाराज आहे याकडे आम्ही पाहत नाही तर जनता नाराज राहता कामा नये ही आमची भूमिका आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्र डागलंय.

    महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.