रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी फीडरनिहाय तंत्रज्ञाची नियुक्ती

भांडूप: निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात महावितरणची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अलिबाग, रोहा तसेच पनवेल ग्रामीण विभागातील अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या

भांडूप: निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात महावितरणची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अलिबाग, रोहा तसेच पनवेल ग्रामीण विभागातील अनेक  ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध स्तरावर काम करून अनेक भागाचा वीजपुरवठा सुरु केला आहे. उर्वरित भागाचा वीज पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आता फीडरनिहाय कर्मचारी नेमण्यात येणार आहे.

 ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी रायगड जिल्ह्याची पाहणी केली होती व अधिक मनुष्यबळ तसेच साहित्य उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते.  त्याप्रमाणे नाशिक, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, औरंगाबाद परिमंडलातून अतिरिक्त मनुष्यबळ रायगड येथे काम करीत आहे. प्रधान सचिव ऊर्जा व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी १४ जून रोजी पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केले. मात्र, आता उर्वरित भागाचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी अजून एक उपाय म्हणून उपविभागीय स्तरावर तार मार्ग कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रत्येक फीडरची वैयक्तिक जबाबदारी दिली जाईल. या कर्मचाऱ्यांनी  दिलेल्या  फीडरवरील वीजपुरवठा त्वरेने सुरळीत करावे असे आदेश त्यांना देण्यात येणार आहे. सदर कामासाठी आवश्यक साहित्य व मनुष्यबळाची मागणी पेण मंडळ कार्यालयात  सूचित करण्याबाबतचे आदेश पेण मंडळाने दिले आहेत. याप्रमाणे, स्थानिक लोकांच्या सहकार्याने तसेच फीडरनिहाय तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांच्यामार्फत विस्कळीत वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे विशेष प्रयत्न महावितरण करीत आहे.