फोडणी सर्वसामान्यांना झोंबली ; खाद्यतेलाचे दर आवाक्याबाहेर , प्रतिकिलो ६० रुपयांची वाढ

देशातील तेलाची मागणी व उत्पादन यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. सोयाबीन व सूर्यफूल तेलाची जवळपास १५० लाख टन आयात करावी लागते. परंतु गतवर्षी कोरोना सुरू झाल्यापासून आयात कमी होत असून, त्याचा परिणाम बाजारभाव वाढण्यावर झाला आहे. भारतात अमेरिका, अर्जेंटिना व ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात आयात होते. तेथील समाधानकारक उत्पन्न नसल्यामुळे त्याचा फटकाही आयातीवर होऊ लागला आहे.

    नवी मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या चक्रव्यूहात सामान्य नागरिकांना डाळी, कडधान्यांचे भाव कधी वाढले हेच समजले नाही.तर आता खाद्यतेलांच्या किमतीही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास ६० टक्के किमती वाढल्या असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारामधून तेलाचा वापरही कमी होऊ लागला आहे. आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यात वाढत्या किमतीमुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

    शासनाच्या कडक निर्बंधाचा फटका जनतेला
    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केल्यामुळे अनेकांना कामावरून घरी बसावे लागले आहे. उत्पन्न कमी झाले असले तरी महागाईमुळे खर्चात मात्र दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

    देशातील तेलाची मागणी व उत्पादन यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. सोयाबीन व सूर्यफूल तेलाची जवळपास १५० लाख टन आयात करावी लागते. परंतु गतवर्षी कोरोना सुरू झाल्यापासून आयात कमी होत असून, त्याचा परिणाम बाजारभाव वाढण्यावर झाला आहे. भारतात अमेरिका, अर्जेंटिना व ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात आयात होते. तेथील समाधानकारक उत्पन्न नसल्यामुळे त्याचा फटकाही आयातीवर होऊ लागला आहे.

    हे आहेत दर
    गतवर्षी सूर्यफूल तेल ९० ते १०० रुपये किलो दराने विकले जात होते. सद्य:स्थितीमध्ये हेच दर जवळपास १६० रुपये किलो झाले आहेत. करडई १८० ते १९०, शेंगदाणा तेल जवळपास १९० रुपये, पामतेल १४८ रुपये किलो झाले आहे. प्रत्येक तेलाच्या दरामध्ये प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आहारातून तेलाचा वापर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

    तेलाचे वर्षभरातील बाजारभाव
    प्रकार २०२० २०२१
    सूर्यफूल ९० ते १०० १४० ते १६०
    सोयाबीन ८५ ते ९० १४० ते १५०
    पामतेल ८० ते ८५ १४० ते १४८
    शेंगतेल ११० ते १२० १८० ते १९०
    करडई १६० ते १७० १८० ते १९०