शिक्षकाने घरीच उभारली प्रयोगशाळा; जगातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातून ऑनलाईन विज्ञानाचे धडे

मुंबई: लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने अनेक केंद्रीय व राज्य बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यास सुरुवात केली.सोलापूरमधील परीतेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेतील

 मुंबई:  लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने अनेक केंद्रीय व राज्य बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यास सुरुवात केली. सोलापूरमधील परीतेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी घरातच प्रयोगशाळा उभारून १७ देशातील ६८ शाळांमधील २४८० विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून विज्ञानाच्या संकल्पना समजावून सांगत आहेत. त्यांच्या या ऑनलाईन प्रयोगशाळेची मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटनेही दखल घेतली आहे.  

तंत्रस्नेही असलेले शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याची दाखल घेत शिक्षण क्षेत्रातील नोबेल समजल्या जाणाऱ्या  ‘ग्लोबल टीचर प्राईझ’ पुरस्कारांमध्ये पहिल्या तीनमध्ये त्यांची निवड झाली होती. शिक्षण क्षेत्रात नेहमी नवनवीन प्रयोग राबवणाऱ्या सोलापूरच्या परीतेवाडीचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यानंतरही अध्यापनाचे काम कायम ठेवले आहे. शाळेत जात येत नसल्याने त्यांनी घरातच छोटीशी प्रयोगशाळा उभी केली आहे. घरातील उपलब्ध साधनांच्या मदतीने विज्ञानातील 27 संकल्पना स्पष्ट करून सांगणारे प्रयोग ते आपल्या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना करून दाखवत आहेत. विशेष म्हणजे हे प्रयोग त्यांच्याच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नसून जगातील १७ देशांमधील ६८ शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखवत आहेत. स्कायपे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते दोन महिन्यांपासून 17 देशांतील 2480 विद्यार्थ्यांना अनेकविध वैज्ञानिक संकल्पना समजून सांगत आहेत. त्यांच्या या ऑनलाइन प्रयोगशाळेच्या प्रोजेक्टला मायक्रोसॉफ्टने त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केले असून मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून अनेक देशांतील विद्यार्थी या ऑनलाइन प्रयोगशाळेचा लाभ घेत आहेत. 

रोज सकाळी 9.30 ते 4  व रात्री 8 ते 9 या कालावधीत ही ऑनलाइन प्रयोगशाळा खुली असते. घनता, दाब, ध्वनी, प्रकाश, वेग आदी संकल्पना ते प्रयोगाच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगत आहेत.  या प्रयोगासाठी घरातील उपलब्ध साधने वापरली जात असल्याने सहभागी विद्यार्थी देखील त्यांच्या घरी बसून हे प्रयोग करत आहेत.