मराठा समाजाला न्याय देण्यासाठी Super Numerary Quotaची होत आहे मागणी ; समजून घ्या काय हा  Quota

सुपर न्यूमररी (अधिसंख्य) कोटा म्हणजे अधिसंख्य पद्धतीने एकूण जागांशिवाय फक्त मराठा समाजासाठी काही जागा आरक्षित ठेवून त्यावर प्रवेश आणि नियुक्त्या देणे.

    मराठा आरक्षणबाबत महाराष्ट्र सरकारचा कायदा आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवला आहे. राज्यात गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारला जाऊ शकत नाही त्यामुळे आरक्षणाची ५० % ची पातळी ओलांडणं शक्य नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने आज SEBC Act अंतर्गत मिळणारं मराठा समाजाचं शिक्षण आणि नोकरी मधील आरक्षण रद्द केले आहे. दरम्यान कोर्टाच्या या निकालावरून समाजात आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. खासदार संभाजी शाहू छत्रपती यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत आता महाराष्ट्र सरकारने पर्यायी आरक्षणाचा विचार करावा असं म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी सुपर न्यूमररी आरक्षणाचा (Super Numerary Quota) विचार करण्यास सूचवलं आहे.

    सुपर न्यूमररी म्हणजे काय?

    सुपर न्यूमररी (अधिसंख्य) कोटा म्हणजे अधिसंख्य पद्धतीने एकूण जागांशिवाय फक्त मराठा समाजासाठी काही जागा आरक्षित ठेवून त्यावर प्रवेश आणि नियुक्त्या देणे. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या महाविद्यालयात १०० जागा असतील तर सरकारने २० जागा वाढवायच्या आणि या अतिरिक्त २० जागा मराठा समाजासाठी आरक्षित ठेवायच्या.दरम्यान यापूर्वी देखील खासदार संभाजी शाहू छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून सुपर न्यूमअररी पर्यायाचा विचार व्हावा असं म्हटलं होतं. सुपर न्यूमररी हा पर्याय राज्य सरकारच्या विचारार्थ असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.