समाजसेवेची हीच खरी वेळ  : पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम

पुणे : ‘पोलीस दलात दाखल होताना सरधोपट उत्तर दिले जाते की मी समाजाची सेवा करण्यासाठी पोलीस दलात रूजू होणार आहे. समाजाची सेवा करायची हीच खरी वेळ आहे.’ याकडे लक्ष वेधताना पोलिसांच्या

पुणे : ‘पोलीस दलात दाखल होताना सरधोपट उत्तर दिले जाते की मी समाजाची सेवा करण्यासाठी पोलीस दलात रूजू होणार आहे. समाजाची सेवा करायची हीच खरी वेळ आहे.’  याकडे लक्ष वेधताना पोलिसांच्या कार्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. टाळेबंदीत पोलीस दलाचे कार्य अधोरेखित होत आहे, अशा शब्दांत पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गेले महिनाभर रस्त्यावर उतरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

डॉ. वेंकटेशम यांनी शहरातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात हे नमूद केले आहे. पुणे पोलीस रस्त्यावर असून सामान्यांची सेवा करत आहेत. नागरिकांना धाक वाटण्यापेक्षा पोलिसांकडून सामान्यांना आधार दिला जात आहे. त्यांना मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

‘पोलीस नेहमी रस्त्यावरून काम करतो. त्याकडे समाज नकळत, अजाणतेपणे दुर्लक्ष करतो. पण टाळेबंदी, संचारबंदीच्या काळात पोलीस दलाचे कार्य आणि त्याग नागरिकांना दिसत असून सामान्यांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे. आपण सगळे एकसंघ होऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडूया. कर्तव्यावर असणाऱ्या प्रत्येकाने स्वत:ची तसेच कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे,’ असे डॉ. वेंकटेशम यांनी पत्रात नमूद केले आहे.

-प्रशंसेबरोबरच काळजी घेण्याचे आवाहन

पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पोलिसांच्या कार्याची प्रशंसा केली असून त्यांनी कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक अंतर पाळा, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. पुढील काही काळ आपल्याला या सर्व गोष्टींचे पालन करावयाचे आहे. पोलीस दल शिस्तीचे खाते म्हणून ओळखले जाते. प्रत्येकाने न विसरता स्वत:ची काळजी घ्यावी. आपण सर्वजण एक कुटुंब आहोत. कठीण काळात संघभावना, सचोटी, सेवाभावी वृत्ती असल्यास निश्चितच करोनारूपी संकटावर मात करू, असे आवाहन डॉ. वेंकटेशम यांनी केले आहे..