यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने
यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने

चतुःशृंगी देवीच्या मंदिरात शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या वर्षीचा नवरात्रौत्सव १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

पुणे : चतुःशृंगी देवीच्या मंदिरात शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या वर्षीचा नवरात्रौत्सव १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

शासनाच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. अशी माहिती ‘श्री देवी चतुःश्रृंगी मंदिर ट्रस्ट’चे अध्यक्ष किरण अनगळ आणि कार्यकारी विश्‍वस्त देवेंद्र अनगळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नवरात्रौत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरे केले जाणार आहेत. येत्या शनिवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा व महावस्त्र अर्पण करून मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी पौरोहित्य करणार आहेत. नरेंद्र अनगळ यांच्याकडे या वर्षीच्या पूजेची जबाबदारी आहे.

देवीची आरती दररोज सकाळी १० वाजता आणि रात्री साडेआठ वाजता करण्यात येणार आहे. रविवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी ८ ते ११ या वेळेत नवचंडी होम करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी विजयादशमीनिमित्त देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या परिसरात सीमोल्लंघन करण्यात येणार आहे.

देवीचे दर्शनआणि सर्व धार्मिक सोहळ्यांचे थेट प्रक्षेपण www.chattushringidevasthanpune.org आणि www.chattushringidevasthan.org या संकेतस्थळांवर पाहाता येणार आहे. भाविकांसाठी देवस्थानच्या फेसबूक पेजवर आणि यूट्यूबवर दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थेट दर्शनासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. भाविकांना देणगी देण्यासाठी विशेष ऍपद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देवीचे मंदिर आणि परिसरातील स्वच्छता व रंगरंगोटीची कामे पूर्ण करण्यात आली असून, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या वर्षी देवीच्या पूजेसाठी अकरा किलो चांदीची उपकरणे घडविण्यात आली आहेत. चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या वर्षीचे सर्वच धार्मिक विधी केवळ कर्मचारी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. या सर्वांचा मेडिक्लेम, कोरोना कव्हर आणि अपघाती विमा उतरविण्यात आला आहे. दररोज तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल तपासली जाणार आहे. शिवाय सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझेशन, मास्क आणि हातमोजांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धार प्रकल्पाला फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या हेरिटेज विभागाने मान्यता दिली आहे. नजिकच्या काळात बांधकाम विभागाची परवानगी मिळणे अपेक्षित आहे. ही परवानगी मिळताच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले जाणार आहे.

ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी ट्रस्टच्या वतीने नुकतीच पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनचे जोशी हॉस्पिटल, रत्ना हॉस्पिटल आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेणार्‍या गरीब आणि गरजू रुग्णांना रुग्णालयांच्या शिफारसीनुसार गेल्या वर्षभरात आर्थिक मदत केली आहे.