कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे उंबर्डेतील माणसे हैराण

कल्याण : कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे उंबर्डेतील नागरीक हैराण झाले असून या कचऱ्यावर घरात माशा घोंघावत आहेत. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे परिसरात कल्याण डोंबिवली महापालिकेने स्वच्छ भारत अभियानंतर्गत उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी दरोज सरासरी १७० मेट्रीक टन घनकचरा टाकला जातो. त्यामुळे नागरीकांनी या प्रकल्पास विरोध केला आहे.

घनकचऱ्यापासून आरटीएफ तयार करण्याचा हा प्रकल्प ३५० मेट्रीक टन क्षमतेचा आहे. हा प्रकल्प बंदीस्त स्वरुपात उभारणे अपेक्षित होते. केंद्र सरकारच्या पर्यावरणाच्या नव्या नियमावलीनुसार हा प्रकल्प उभारला गेला नाही. प्रकल्पाच्या बाजूलाच भात शेती आहे. या प्रकल्पामुळे भातशेतीही धोक्यात आली आहे. प्रकल्पाभोवती संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. कोटय़ावधी रुपये खर्च करुन प्रकल्प उभारला असला तरी त्याचा त्रास नागरीकांना होत आहे. प्रकल्पास आमचा विरोध नाही. प्रकल्प पूर्ण अटी शर्तीनुसार तयार केला जाणे अपेक्षित आहे. तो केला गेला नसल्याने त्याचा त्रास नागरीकांनी का सहन करायचा असा प्रश्न परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वंडार कारभारी यांनी उपस्थित केला आहे.

 हा प्रकल्प ऑक्टोबरमध्ये सुरु केला होता. त्यानंतर तो बंद होता. आत्ता मार्च महिन्यात सुरु केला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी बंदिस्त भिंत बांधणे हे काम बाकी आहे. दुर्गंधी येऊ नये यासाठी कचऱ्यावर सुगंधी द्रव्ये मारले जाणार आहे. प्रकल्पावर आत्तार्पयत १० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून आणखी सात कोटीची आवश्यकता आहे. प्रकल्पाच्या अन्य कामासाठी सुधारीत प्रकल्प आराखडा व वाढीव निधीची मागणी केली आहे. हा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या शिफारस समितीकडे प्रलंबित असल्याचे या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी सांगितले.