धक्कादायक! मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक ; काेट्यवधींच्या ‘राेकड’ची सर्वत्र चर्चा

अंबड पोलीस ठाण्याचे हद्दीत उंटवाडी नजीक एका मद्यधुंद चारचाकी वाहनाच्या चालकाने दुसऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली; मात्र चारचाकी वाहनांत कोट्यवधींची रोकड असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवीन नाशकात खळबळ उडाली.

    सिडको : अंबड पोलीस ठाण्याचे हद्दीत उंटवाडी नजीक एका मद्यधुंद चारचाकी वाहनाच्या चालकाने दुसऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली; मात्र चारचाकी वाहनांत कोट्यवधींची रोकड असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवीन नाशकात खळबळ उडाली.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवार (दि.२८) रात्री स्विफ्ट डिझायर (एमएच ०१ एई ९८१०) वरील चालक चंद्रकांत अंबादास दाहीजे(रा. तिडके कॉलनी) याने भरधाव वेगाने गाडी चालवून चारचाकी (एमएच १५ जीए ७८०६) हिला व दुचाकी (एमएच १५ एफडब्ल्यू ७७०३) यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार अमोल बुरकुले हे जखमी झाले. दरम्यान अपघातानंतर स्विफ्ट डिझायर या गाडीमध्ये नोटांचे बंडल असल्याचे घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांना दिसले दरम्यान त्यातील काहींनी अंबड पोलीस यांना याबाबत माहिती दिली यावरून सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक प्रकाश कातकडे,अंमलदार योगेश शिरसाठ, अनिल गाढवे, धनराज बागूल, किरण सोनवणे, संजय सपकाळे, केशव ढगे, कुणाल राठोड, कमलेश आवारे आदींचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व परिस्थितीचा आढावा घेत अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर टोइंगद्वारे अंबड पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

    दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर सदर अपघातग्रस्त गाडीमध्ये दोन कोटी रुपये असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने अंबड पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अंबड पोलिसांनी सदरहू पैशाची बॅग उघडून बघितली असता त्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या नोटा त्यावर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असा उल्लेख केला असल्याचे आढळून आले याप्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात या लहान मुलांच्या खेळण्यात येणाऱ्या नोटा सदरहू गाडीत आल्या कशा? याचा तपास आता पोलीस करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे करीत आहेत.